पालिका जलवाहिन्यांची दुरुस्ती, बदली, आकारमान वाढवणार; पूर्व उपनगरातील गळती थांबणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या माध्यमातून पूर्व उपनगरातील पाण्याची गळती रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर काम हाती घेण्यात आले असून जलवाहिन्या बदलणे आणि जलवाहिन्यांचे आकारमान वाढवण्यात येणार असून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका 6 कोटी 62 लाख रुपये खर्च करणार आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, नाहुर, घाटकोपर, कन्नमवार नगर येथे काही भागात वारंवार पाण्याची गळती झाल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे संबंधित भागातून पाणीटंचाईच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधींकडून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून संबंधित भागातील पाण्याची गळती रोखणे आणि पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्याची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांसाठी पालिका तब्बल सहा कोटींहून अधिक खर्च करणार आहे. या कामासाठी पालिकेने सात कोटी 90 लाख रुपये खर्च अपेक्षित धरला होता, मात्र कंत्राटदाराने 16 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे पालिकेच्या सुमारे एक कोटी 28 लाख रुपयांची बचत होणार आहे. येणाऱया वर्षभरात ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

अशी होणार विभागातील कामे

कुर्ला व घाटकोपर येथील जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कुर्ला विभागात 60 फूट डी. पी. मार्ग साकी विहार ते रहेजा विहारपर्यंत 300 मिमी व्यासाची व 650 मिमी मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे 300 मिमी, मारवाडी मार्ग येथे 250 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच संघर्ष नगर येथेही जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

घाटकोपर उत्कर्ष चाळ मार्ग, डी. बी. पवार चौक, रमाबाई नगर येथे 80 मिमी व्यासाची 177 मीटर लांब जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. हनुमान टेकडी पंपिंग ते खांडेकर मैदान, सहभाग मित्र मंडळ ते साईप्रेमी मित्र मंडळ, सहभाग मित्र मंडळ ते अचानक मित्र मंडळपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.