
मालाडमधील मालवणी परिसरातील आक्सा बीचवर एका वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह एका गोणीत भरलेला होता व तरुणीची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आलेला आहे
मालवणी पोलिसांना गुरुवारी आक्सा बीचवर एका गोणीत मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. साधारण वीशीतल्या तरुणीचा तो मृतदेह असून ओळख न पटण्यासाठी तिचा चेहरा विद्रुप केलेला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तीन-चार दिवसांपूर्वी तिची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे.
तरुणीच्या डाव्या दंडावर टॅटू असून तिच्या अंगावर लाल मण्यांची माळ आणि मंगळसुत्र सापडले आहे. मृतदेह आक्सा बीचवर आणून फेकला आहे की दुसरीकडे पाण्यात फेकलेला मृतदेह वाहत इथे आला आहे याबाबत पोलिसांना नेमके सांगता येत नाहीये. अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली आहे. तसेच अन्य पोलीस स्थानकांमध्ये बेपत्ता तरुणींची कुठे नोंद झालेली आहे का ते तपासत आहेत.
दरम्यान कांदिवलीच्या समतानगर पोलिस स्थानकात एक वीस वर्षांची तरुणी 8 डिसेंबर पासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याचा या तरुणीशी संबध आहे का याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.






























































