
रिपब्लिक टीव्हीच्या टीआरपीत झालेली वाढ ही पूर्वनियोजित असून टाइम्स नाऊ हे चॅनल्स एक नंबर ला असताना डेटामध्ये फेरफार करून रिपब्लिक टीव्हीला नंबर 1 वर आणले गेल्याचे ब्रॉडकास्ट ऑडीएन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) ने केलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये समोर आले आहे. बार्कमधील काही अधिकाऱयांना हाताशी धरून हा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ होणार आहे. टीआरपी घोटाळ्यातील मास्टरमाईंड पार्थे दासगुप्ताला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
टीआरपी घोटाळ्याबाबत मुंबई क्राईम ब्रँचचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्या परिषदेत टीआरपी घोटाळ्याबाबत माहिती दिली. पार्थ दासगुप्ता हे 2013 ते 2019 पर्यंत बार्पमध्ये काम करत होते. त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी होत्या. 2019 मध्ये बार्कचे मॅनेजमेंट बदलण्यानंतर एक थर्ड पार्टी ऑडिट करण्यात आले. त्याचा अहवाल बार्कने मुंबई पोलिसांना दिला आहे.
जून 2017 मध्ये जेव्हा 44 आठवडयाचे ऑडिट केले गेले तेव्हा टाइम्स नाऊ नंबर 1 असताना डेटामध्ये फेरफार करून रिपब्लिक टीव्हीला नंबर 1 वर आणले गेले. रिपब्लिक टीव्हीची टीआरपी वाढ ही पूर्व नियोजित असल्याचे त्या अहवालात स्पष्ट झाले आहे. तर एका तेलगू चॅनल्सचेदेखील टीआरपी वाढल्याचे तपासात समोर आले आहे.
तीन पद्धतीने केला जात होता घोटाळा
टीआरपी वाढवण्यासाठी आऊटलायर, मेटारुल आणि चॅनल्स ऑडियन्स कंट्रोलचा वापर केला जात होता. टीव्हीच्या महसुलात होणारे बदल, व्यूअर शिपची माहिती रिपब्लिक टीव्हीला पुरवली जात होती. पोलिसांना काही ईमेल आणि चॅट्स हाती लागले आहेत. त्यावरून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पदाचा केला गैरवापर
पार्थ हा 2013 ते 2019 या काळात बार्कमध्ये कामाला होता. टीआरपी मोजण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅरोमीटरच्या गोपनीय माहितीत फेरफार करून ठराविक चॅनल्सचा टीआरपी वाढवला जात होता. रोमिल आणि पार्थ मध्ये झालेले व्हाट्स अप संभाषण पोलिसांच्या हाती लागले आहे. टीव्ही व्यूअरशिप बाबतच्या गोपनीय माहितीबाबत ते चर्चा करून ती माहिती रिपब्लिक टीव्हीला पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर टीआरपी वाढवण्यासाठी पार्थ हा त्याच्या सहकाऱयावर दबाव टाकत होता.






























































