
उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कहर वाढला आहे. आगामी काही दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार असून डोंगराळ भागातील राज्यात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच उत्तरेकडील मैदानी राज्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामानात होणाऱ्या या बदलामुळे थंडीचा कडाका वाढणार असून वातावरण आणखी प्रतिकूल होणार आहे.
Ground frost conditions are likely in isolated pockets over Uttarakhand, Himachal Pradesh, Punjab, Haryana, Chandigarh & Delhi, Rajasthan and west Madhya Pradesh during December 29-31. Cold day conditions are likely over Punjab during the next 24 hours: IMD https://t.co/mNN5Y0wnj7
— ANI (@ANI) December 27, 2020
उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाका वाढण्यासह धुक्यांमध्येही वाढ होणार असून दृश्यमानता कमी होणार आहे. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात वातावरण आणखी प्रतिकूल होणार आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे वातावरणात मोठे बदल होणार आहेत. या बदलांमुळे जम्मू कश्मीर, लडाखसह डोंगराळ भागात 27,28 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होणार आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड,दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये दाड धुके पसरण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. 29 ते 31 डिसेंबरदरम्यान धुके वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर येत्या 24 तासात पंजाबमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे.
हिमाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालच्या काही भागात रविवारी थंडीची लाट दिसून आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हरियाणातील नारनौलमध्ये 3.3 अंश सेल्सियसपर्यंत पारा खाली आला होता. गेल्या काही दिवसांपासून उत्तर हिंदुस्थानात थंडी आणि धुके वाढत आहे. त्यात आता या आठवड्यात हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने वातावरण आणखी प्रतिकूल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




























































