स्वर-शिल्पाचा अनोखा आविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिल्पकार सुनील देवरे यांचा ‘मुरत’ लघुपट यूटय़ूबवर अजिंठा वेरुळचा कलाकार अशी ओळख आपल्या कलेतून निर्माण करणारे शिल्पकार म्हणजे सुनील देवरे. संगीतप्रेमी असलेल्या सुनील देवरे यांनी आपल्यातील शिल्पकलेवरच आधारित मुरत नावाचा लघुपट तयार केला असून, यूटय़ूबवर त्याला कलाप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जी आर्टच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या लघुपटामध्ये शब्द आणि सुरांच्या माध्यमातून अविष्कृत होणारे संगीत, तसेच अमूर्ततेकडून प्रकट होत जाणारे शिल्प या पार्श्वभूमीवर हळुवारपणे फुलत गेलेल्या प्रेमाची मांडणी करण्यात आली आहे. सुनील देवरे यामध्ये शिल्पकाराच्या भूमिकेत आहेत. शिल्प साकारण्यासाठी त्यांनी निवडलेली मॉडेल, तिची मुव्हमेंट, विशिष्ट पद्धतीने केलेले मोजमाप, चेहऱयावरील हावभाव, एकाग्रता आणि एकूणच मूर्तिमंत शिल्प घडवतानाची प्रक्रिया या लघुपटामध्ये पाहावयास मिळते. या पार्श्वभूमीवर सावरियाने कैसा जादु डाला, बाजुबंद खुल खुल जाये ही गायिका आरती पाटणकर यांची ठुमरी ऐकता येते. मॉडेलची भूमिकेत ऋतुजा गावकर असून छायाचित्रण समीर कनगुटकर यांचे आहे.