अखेर झाडांची वेदनेतून झाली मुक्तता, ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ मोहिमेला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देत झाडं लावली जातात. मात्र झाडांनादेखील संवेदना असतात, हे विसरून अनेक ठिकाणी झाडांवर खिळे, फलक, तारा, अँगल, लोखंडी ब्रॅकेट मारले जातात. यामुळे झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ मोहीम राबविण्यास येत आहे. त्याचा शुभारंभ आजपासून झाला.

‘खिळेमुक्त झाडाचं कोल्हापूर’ मोहिमेत कोल्हापुरातील 50 स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या. शेकडो वृक्षप्रेमीदेखील स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. त्यांनी ठिकठिकाणी जाऊन झाडावरील खिळे, फलक, तारा, अँगल काढून झाडांना नवे जीवन दिले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ झाला. झाडांना इजा पोहोचविणे, त्याच्यावर खिळे मारणे हा गुन्हा आहे. यापुढे झाडांवर खिळे मारणाऱयांवर अथवा बोर्ड लावणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. यासंदर्भातील सूचना कोल्हापूर महानगरपालिकेला दिल्या आहेत. केवळ कोल्हापुरापुरती ही मोहीम मर्यादित न राहता राज्यभर अशा प्रकारची मोहीम लोकांनी हाती घेण्याचं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

  • स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांना एका झाडावर तीस ते चाळीस खिळे असल्याचे आढळले. त्यांनी पक्कड, शिडी यांच्या साहाय्याने झाडांवरील खिळे काढले.
  • काही झाडावर असलेले लोखंडी ब्रॅकेट, साखळ्या काढण्यासाठी गॅस कटरचा सुद्धा वापर करण्यात आला. बरीच वर्षे झाडांमध्ये रुतून बसलेले खिळे तसेच करकचून बांधण्यात आलेल्या तारा काढल्यामुळे या झाडांनी मोकळा श्वास घेतला.