
मुंबईतून थेट गोव्यात सुस्साट वेगाने जाण्याचे स्वप्न साकार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सुमारे साडे चारशे किमी लांबीच्या महामार्गाच्या चौपदीकरणाचे जवळजवळ 44 टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च 2022 अखेरपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यानंतर शिमगा आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांना खड्ड्यांच्या विघ्नाविना आरामात प्रवास करता येईल.
चौपदीकरणाचे काम वेगात सुरू
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु आहे. सध्याचा या महामार्गावरचा प्रवास अतिशय खडतर आणि खड्डय़ांनी भरलेला आहे. कोरोनामुळे या कामाला ब्रेक बसला. लॉकडाऊनच्या काळात बांधकाम मजूर गावी गेले. मात्र अनलॉकनंतर या कामाला वेग आला आहे. त्यामुळे आता लवकरच हे चित्र बदलून चाकरमान्यांना आरामदायी प्रवास अनुभवता येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.
पनवेल-झाराप पूर्ण
सुमारे 450 किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गापैकी पनवेल ते सिंधुदुर्ग जिह्यातील झारापपर्यंतच्या 230 किमी लांबीच्या चौपदरीकरणाचे काम मागील महिन्याच्या डिसेंबर महिन्यात पूर्ण झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम (अरवली ते वाकड वगळता) मार्च 2022मध्ये पूर्ण होईल. अरवली ते वाकड हा 91 किलोमीटरचा मार्ग डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
महामार्गावरील कामाची स्थिती
- पनवेल ते इंदापूर-84 किमी रस्ता-86.14 टक्के काम पूर्ण-डिसेंबर 2021 पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला
- इंदापूर-24.430 किमी-26.28 काम पूर्ण-मार्च 2022पर्यंत वाहतुकीला खुला
- वीर ते भोगाव-39.570किमी -45.69 टक्के काम पूर्ण-डिसेंबर 2021पर्यंत खुला
- भोगाव ते खावटी-13.600(किमी)- 33.24टक्के काम पूर्ण-मार्च 2022पर्यंत सुरु
- कशेडी ते परशूराम घाट-43.800(किमी)-80 टक्के काम पूर्ण-जून 2021पर्यंत खुला
- परशुराम घाट ते अरवली-35.900(किमी)–24 टक्के काम पूर्ण-डिसेंबर 2021 वाहतूक सुरु
- अरवली विभाग–40 किमी-8.61टक्के काम पूर्ण-डिसेंबर 2022 पर्यंत खुला
- वाकड विभाग-50.900(किमी)–12 टक्के काम पूर्ण-डिसेंबर 2022पर्यंत वाहतुकीला खुला
- वाकड ते तळेगाव–35(किमी)-85.6टक्के काम पूर्ण-मार्च 2021 वाहतुकीला खुला
- तळेगाव ते कंठे-38.830(किमी)-92 टक्के काम पूर्ण
- कलमठ ते झरप -44.140(किमी)-98 टक्के काम पूर्ण
































































