
कोरोना महामारीत खाजगी क्षेत्रातील रोजगारावर गदा आली असतानाच आता नोकरदारांचा ‘भविष्यनिर्वाह’ही संकटात सापडला आहे. मोदी सरकार लवकरच ईपीएफओच्या व्यवस्थेत मोठा बदल करणार आहे. कामगार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी संसदीय समितीला काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार नोकरदारांच्या पगारातून पीएफची जेवढी रक्कम कापली जाईल तेवढीच पेन्शन मिळणार आहे.
ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने ऑगस्ट 2019मध्ये किमान पेन्शन 2000 रुपयांवरून 3000 रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. मात्र कामगार मंत्रालयाने ही शिफारस मान्य केली नाही.
याबाबत संसदीय समितीने कामगार मंत्रालयाचे मत मागवले होते. त्यावर किमान पेन्शन 2000 रुपये केली तर तिजोरीवर 4500 कोटी रुपयांचा भार पडू शकतो आणि 3000 रुपये केली तर सरकारला 14595 कोटींचा अतिरिक्त भुर्दंड बसू शकतो, असे मंत्रालयाने कळवले.
कामगार मंत्रालयाच्या नेमक्या शिफारशी काय?
ईपीएफओचा पेन्शन फंड व्यावहारिक बनवण्यासाठी सध्याची व्यवस्था संपुष्टात आणा.
पीएफची पेन्शन ‘डिफाईन्ड बेनिफिट्स’च्या मॉडेलवर ठरते. आता पगारातून जेवढी रक्कम कापली जाईल, तेवढीच रक्कम पेन्शन स्वरुपात देण्यात यावी.
देशभरात ईपीएफओच्या 23 लाख पेन्शनर्सना महिन्याला 1 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. या तुलनेत त्यांच्या पगारातून दरमहा कटिंग झालेली रक्कम एक-चतुर्थांशपेक्षाही कमी होती. सरकारला हा भार पेलवणारा नाही.
शेअर बाजारातील गुंतवणुकीला कोरोनाचा मोठा फटका
ईपीएफओने शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या माध्यमातून निधी जमवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कोरोना महामारीने या प्रयत्नांना जोरदार हादरा दिला. ईपीएफओचा एकूण निधी 13.7 लाख कोटी रुपये इतका आहे. यातील केवळ पाच टक्के म्हणजेच जवळपास 4600 कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवण्यात आले होते. महामारीमुळे या गुंतवणुकीतून निराशा पदरी पडली.




























































