
मुंबई विद्यापीठातील रिक्त असलेल्या कुलसचिव पदावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय विज्ञान संस्था नागपूरचे डॉ. रामदास आत्राम हे यापुढे विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
विद्यापीठाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने रिक्त असलेल्या कुलसचिव पदावर थेट नियुक्ती केली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू झाली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 8 (5) नुसार सरकारला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली आहे. माजी कुलसचिव अजय देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या पदावर विद्यापीठाने तात्पुरती प्राचार्य बळीराम गायकवाड यांची नेमणूक केली होती.
या नेमणुकीला काही दिवस होत नाहीत तोच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शुक्रवारी (ता.8) अध्यादेश काढून डॉ. रामदास आत्राम यांची नियुक्ती केली आहे. एक वर्षांसाठी अथवा नवीन कुलसचिव यथोचितरित्या नियुक्त होईपर्यंत ते या पदावर असणार आहेत.
जर विद्यापीठास आत्राम यांची सेवा आवश्यक वाटली नाही तर त्यांना मूळ कार्यालयाकडे परत पाठविण्याची मुभा देण्यात आली आहे.
मात्र, नवनियुक्त कुलसचिवांना परत पाठविण्यापुर्वी विद्यापीठाने संबंधितास तीन महिने अगोदर नोटीस देण्याची अट घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याबाबत सरकारला माहिती देण्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
तसेच आत्राम यांना मूळ कार्यालयाकडे जाण्याची इच्छा असल्यास त्याबाबत तीन महिने अगोदर विद्यापीठास लेखी नोटीस द्यावी लागेल. यासह सरकारला माहिती दिल्यानंतरच त्यांना मूळ कार्यालयाकडे परत जाता येणार आहे.


























































