भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या घटनेसंदर्भात तत्काळ चौकशीचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज भंडारा दुर्घेटनेतील मृत बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे देखील सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यासोबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले देखील होते.
सोणझरी परिसरातील गीता विश्वनाथ बेहरे यांच्या बाळाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज त्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री तुमसर तालुक्यातील सालेकसा येथील कविता बारेलाल कुमरे यांच्या कुटुंबीयांना भेटले. कुमरे यांनी देखील या दुर्घटनेत आपले बाळ गमावले आहे. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी ही अत्यंत धक्कादायक व वेदनादायी घटना आहे. आपल्या दुःखात मी व शासन आपल्या सोबत असल्याचे पीडित कुटुंबीयांना सांगितले.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, तपासात कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नागपूरहुन भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि गीता बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी.एस. रहांगडाले यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत.































































