विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची, सहा महिन्यांसाठी 72 लाख मास्क खरेदी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असून राज्य सरकारनेही 15 जानेवारीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या शिक्षण विभागानेही जोरदार तयारी केली असून पुढील सहा महिन्यांकरिता तीन लाख पालिका विद्यार्थ्यांसाठी सुमारे 72 हजार मास्क खरेदी केले जाणार आहेत. एका विद्यार्थ्याला दर महिन्याला 4 मास्क देण्यात येणार आहेत. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

मुंबईत पालिकेने राबवलेल्या कोरोनाविरोधातील मोहिमांमुळे कोरोना नियंत्रणात आला असून सध्या कोरोना रुग्णांची संख्या 800च्या खाली आली आहे. राज्य आणि पालिकेचे नियम पाळून दुकाने, हॉटेल सुरू झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर, 15 जानेवारीनंतर मुंबईतील शाळा उघडण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे 2 लाख 96 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळा सुरू झाली तर त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सगळ्या शाळ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली.

राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर, शाळा सुरू करण्यात आल्या तर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. दर दिवशी विद्यार्थ्यांचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी तपासली जाणार आहे. पालिका विद्यार्थ्यांना मास्क मोफत दिले जाणार असून हे मास्क लहान व मोठय़ा आकाराचे असतील. हे मास्क पुन्हा धुऊन वापरता येतील. – महेश पालकर, पालिका शिक्षण अधिकारी