वृत्त – ‘दर्पण’कार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

दर्पण म्हणजे आरसा. प्रतिबिंब दाखवणारा. आपण कसे दिसतो हे समजण्यासाठी आरशासमोर उभं राहावं लागतं, परंतु पारा असलेला आरसा फक्त आपलं बाह्यरूप दाखवतो. ‘मन दर्पणा’त जे दिसतं ते केवळ आपल्यालाच ठाऊक असतं. ‘भले-बुरे सारे कर्मो को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए’ हे आशाताईंचं गाणं आठवा. व्यक्तीच्या मनाचं प्रतिबिंब जसं आतल्या आत दिसतं तसं समाजमनाचं प्रतिबिंब तत्कालीन लेखन, चित्र-शिल्प, काव्य, राज्यपद्धती यातून व्यक्त होत असतं.

म्हणूनच मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राचं नाव ‘दर्पण’ असावं हे अगदी उचित म्हणावं लागेल. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मराठी वृत्रपत्रसृष्टीचा पाया घातला. त्यांच्यापूर्वी ‘मुंबापूर वर्तमान’ नावाचे पत्र असल्याचा उल्लेख सापडतो, परंतु ‘दर्पण’चे उपलब्ध दुर्मिळ अंकांतून बाळशास्त्रीची विचारधारा आणि त्यांची विविध क्षेत्रांतील बुद्धिमत्ताही प्रगट झालेली दिसते. वृत्तपत्र व्यवसाय पदार्पणातच नावारूपाला आणल्याचं श्रेय बाळशास्त्रीकडे जातं. अवघं 33 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या विचारवंताने अल्पवयात जे कार्य केलं ते कोणाही मराठी माणसाला आणि देशवासीयांनाही अभिमानास्पद वाटावं असंच आहे.

6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. आपले विचार मराठी वाचकांप्रमाणेच इंग्रजी राज्यकर्त्यांनाही समजावेत म्हणून जांभेकरांनी ‘दर्पण’चं स्वरूप मराठी-इंग्रजी असं ठेवलं. त्यात मराठी लेखांचे इंग्रजी भाषांतर आणि इंग्लिश लेखांचे मराठी भाषांतर असा अभिनव प्रयोग त्यांनी पहिल्याच वृत्तपत्रात केला. आजही असे ‘बायलिंग्वल’ वृत्तपत्र असेल तर ते घरात इंग्लिश शिकणाऱयांनाही वाचता येईल आणि आपल्या संस्कृतीची ओळख होईल. बाळशास्त्रीच्या ‘दर्पण’मधील मोलाची कामगिरी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनही दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करते.

कणातील पोंभुर्ले गावात जन्मलेले बाळशास्त्री बालपणापासूनच विलक्षण प्रतिभावंत होते. उत्तम स्मरणशक्तीबरोबर स्वतंत्र विचाराची प्रज्ञा त्यांना लाभली होती. ते तेराव्या वर्षी (1825) पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले आणि तिथे त्यांचा इंग्लिश भाषेशी आणि इंग्रज राजवटीशी थेट परिचय झाला. इंग्लिश शाळेत शिकत असतानाच इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याइतकी त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांना 15 रुपये पगारावर शाळेतच काम मिळाले. वयाच्या अवघ्या पंधरा-सोळाव्या वर्षी इंग्लिश मुख्याध्यापकाने नवतरुण बाळशास्त्रीवर विश्वास ठेवावा यातून त्यांची बुद्धिमत्ता सिद्ध होते.

पुढे अल्पकाळातच बाळशास्त्रीनी इंग्लिशवर प्रभुत्व मिळवले. संस्कृत त्यांना आधीपासूनच येत होते आणि मराठी तर मातृभाषाच होती. याव्यतिरिक्त गुजराती, बंगाली, तेलुगू एवढंच नव्हे तर फ्रेंच आणि लॅटिनोद्भव भाषांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यांनी अव्याहतपणे विपुल विषयांवर लेखन केले. त्यांच्या या बुद्धिमत्तेचा प्रभाव इंग्रजांवरही पडला आणि सेक्रेटरी म्हणून त्यांना 1832 मध्ये 100 रुपये पगार मिळू लागला. त्या काळाच्या मानाने ही रक्कम फार मोठी म्हणावी लागेल. असे पगार इंग्रजी राजवटीत फक्त इंग्रजांना असत.

याच वर्षी त्यांनी ‘दर्पण’ सुरू केले. त्याचे इंग्लिश नाव ‘द बॉम्बे दर्पण’ असे होते. त्यात ‘दर्पण’चे स्पेलिंग ‘Durpun’ असे आढळेल. कारण इंग्लिश भाषेत ‘अ’साठी मुख्यत्वे ‘U’ हे अक्षर वापरले जाते.

‘दर्पण’मधून बाळशास्त्रीनी साहित्य, विज्ञान आणि सामाजिक परिस्थितीवर विस्तृत भाष्य केले आहे. त्यांची मते सुधारणावादी आणि उदारमतवादी होती. धर्मातील कर्मकांडावर त्यांनी टीका केली. जगभरातील विविध देशांची माहिती दिली. तिथल्या रीतीरिवाजांबद्दल लिहिले. स्त्री-पुरुष समानता, स्त्री शिक्षण अशा अनेक विषयांवर त्यांनी रुढीवाद्यांच्या विरोधात जाऊन परखड भाषेत लेखन केले. महाराष्ट्रात त्यानंतर सुधारकांची फळीच तयार झाली.

बाळशास्त्रीच्या विज्ञान लेखाचा फायदा आम्हाला खगोल अभ्यास करताना आला. ‘दर्पण’मधून त्यांनी तारकासमूहांच्या इंग्रजी नावाला पर्यायी नावे सुचवली. आम्ही ती आजही आकाशदर्शनात वापरतो. उदा. देवयानी (ऍन्ड्रोमीडा), शर्मिष्ठा (कॅसिओरिया), ययाती (पार्सियस) वगैरे. ही नावे अगदी सुयोग्य वाटतात व अभ्यासकांच्या लक्षातही राहतात. बाळशास्त्रीचे निधन 18 मे 1846 रोजी 34 व्या वर्षी झाले. अत्यल्प आयुष्य लाभूनही तेजाने तळपणाऱया या पहिल्या मराठी पत्रकाराचं संस्मरण आम्हा पत्रकारांसह सर्वांनाच स्फूर्तीदायक असंच आहे.