
05पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसांपासून गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. कोल्हापुरातील 386, नगर जिह्यातील 705, सांगली जिह्यातील 143, सातारा जिह्यातील 652, तर सोलापूर जिह्यातील 658 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार असून, त्यासाठीची सर्व तयारी निवडणूक विभागाकडून पूर्ण करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडूनही गावोगावी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक असलेल्या गावांमध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तुफान रणधुमाळी पाहायला मिळाली. चौकाचौकांत बॅनर, घरोघरी पत्रके, रस्तोरस्ती वाहनांतून ध्वनिक्षेपकावरून प्रचार यामुळे एकूणच वातावरण ढवळून निघाले होते. उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचाही मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला होता.
कोल्हापूर जिह्यातील 386 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान
कोल्हापूर ः जिह्यात एप्रिल ते डिसेंबर 2019 या कालावधीत जिह्यातील मुदत संपलेल्या 433 पैकी 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, शिल्लक राहिलेल्या 386 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील गावांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून, ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. अडीच हजार पोलीस व दीड हजार होमगार्ड्स असा चार हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 हजार 260 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या असून, 942 हजार जमा केली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
सातारा जिह्यातील 652 गावांत होणार मतदान
जिह्यात एकूण 878 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गेले महिनाभर जिह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिह्यात 118 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, तीन ग्रामपंचायती अशा आहेत की त्या ठिकाणी एकाही उमेदवाराने अर्जच दाखल केलेला नाही. जिह्यातील 652 ग्रामपंचायतींसाठी 15 रोजी मतदान पार पडत आहे. एकही वैध अर्ज प्राप्त न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची संख्या 386 इतकी आहे. एका जागेसाठी फक्त एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध झालेल्या जागांची संख्या 2648, तर प्रत्यक्ष मतदान होणाऱया जागांची संख्या 4230 इतकी आहे.
सोलापूर जिह्यात तीन दिवस ड्राय डे
सोलापूर जिह्यात 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, निवडणुका शांततेच्या मार्गाने होण्यासाठी जिह्यातील सर्व मद्यविक्री उद्या (दि. 14), मतदानाच्या दिवशी (दि. 15) आणि मतमोजणीच्या दिवशी (दि. 18) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीं दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱया अनुज्ञप्तीधारकांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा आदेशात देण्यात आला आहे.
नगर जिह्यात साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त
जिह्यातील 705 ग्रामपचायतींच्या 5 हजार 788 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 13 हजार 194 उमेदवारांच्या प्रचाराची सांगता झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिह्यात एकूण 15 हजार 693 अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचाऱयांना शेवटच्या टप्प्यातील प्रशिक्षण गुरुवारी (दि.14) दिले जाईल. प्रशिक्षणानंतर या कर्मचाऱयांना मतदान केंद्रावर साहित्यासह रवाना केले जाणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहिता भंगाचा एकही गुन्हा जिह्यात दाखल झाला नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली. जिह्यात सुमारे साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. निवडणुकीकरिता पाच तुकडय़ा, 1300 होमगार्ड्स, 2000 पोलीस तसेच बाहेर जिह्यातून 325 पोलीस असा एकूण साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सांगली जिह्यात प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात
जिह्यातील 143 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा बुधवारी शांत झाला. शुक्रवारी मतदान होणार असून, प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानासाठी शेवटचे 24 तास राहिले आहेत. जिह्यातील 152 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. 141 ग्रामपंचायतींच्या 1 हजार 373 जागांसाठी 2 हजार 886 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. इलेक्ट्रिक मतदान यंत्रांची तपासणी करण्यात आली आहे. मतदानासाठी 4 हजार 169 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. 662 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, 4 लाख 13 हजार 519 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

























































