राज्य मानवी हक्क आयोगावरील नियुक्तीवर तुकाराम मुंढे नाखूश, साईड पोस्टिंगची भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश चुरी । मुंबई

नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर प्रतिक्षेत असलेले धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची तब्बल आठ महिन्यांनंतर राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संथगतीने कामकाज सुरू असलेल्या मानवी हक्क आयोगाच्या कामाला वेग येईल अशी चिन्हे होती. पण तुकाराम मुंढे आयोगाची सूत्रे स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येते.

राज्य मानवी हक्क आयोगावर गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ सचिवच नव्हता. अंशू सिन्हा यांची आयोगावरील सचिव पदावरून सामान्य प्रशासन विभागात बदली झाली. त्यामुळे सिंचन विभागाचे सचिव व्ही. के. गौतम यांच्याकडे आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

आता तुकाराम मुंढे यांची आयोगाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे येत्या एक-दोन दिवसांत पदाची सूत्रे स्वीकारतील अशी आयोगात चर्चा होती. पण आयोगावर येण्यास तुकाराम मुंढे नाखूश आहेत. त्यामुळे सध्या तरी ते पदाची सूत्रे स्वीकारणार नाहीत असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते.

आयोगावर नियुक्ती नकोच

कोणताही सनदी अधिकारी आयोगाच्या सचिव पदावर काम करण्यास नाखूश असतो. अलीकडच्या काळात अंशू सिन्हा या त्यांच्या वैयक्तीक कारणासाठी केवळ सोय म्हणून आयोगावर आल्या होत्या असे सांगण्यात येते आताही व्ही. के. गौतम हे आठवडय़ातून एक-दोनदाच आयोगात येतात. कारण त्यांच्याकडे मंत्रालयात आधीच कामाचा व्याप भरपूर आहे.

चेअरमन व सदस्यांच्या हाताखाली काम

सनदी अधिकाऱ्य़ाला मंत्रालयात रुबाबात काम करण्याची सवय असते. पण सचिव म्हणून आयोगात आल्यावर सनदी अधिकाऱ्य़ाला ‘इगो’ बाजूला ठेवत आयोगाचे चेअरमन व दोन सचिवांच्या हाताखाली काम करावे लागते.

या तीन अधिकाऱ्य़ांच्या सूचनांचे पालन करावे लागते. सचिवाचा ‘सीआर’ आयोगाचे चेअरमन व दोन सचिव तयार करतात. या तीन अधिकाऱ्य़ांच्या हाताखाली काम करताना सनदी अधिकाऱ्य़ाची घुसमट होते. आयोगावरील नियुक्ती ही साईट पोस्टिंग समजली जाते.