
बेकायदा वाळूचोरी रोखण्यासाठी नाशिक विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिह्यातील टोल नाक्यांवर 24 तास महसूल पथकाचा वॉच राहणार आहे. टोल नाक्यांवर महसूल पथकाची नेमणूक करून त्याद्वारे वाळूचोरी रोखावी, असे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी पाचही जिल्ह्यांचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे बोलत होते. यावेळी अपर आयुक्त भानुदास पालवे, उपायुक्त (महसूल) गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त (पुनर्वसन) दत्तात्रय बोरुडे, उपायुक्त (रोहयो) अर्जुन चिखले, उपायुक्त (सा. प्र.) प्रवीण देवरे, उपायुक्त (पुरवठा) स्वाती देशमुख, उपायुक्त (विकास) अरविंद मोरे, सहआयुक्त कुंदन सोनवणे उपस्थित होते, तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक येथून जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, नगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, धुळे जिल्हाधिकारी संजय यादव, जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड उपस्थित होते.
राधाकृष्ण गमे म्हणाले, जिल्हाधिकाऱयांनी पाण्याखाली असलेल्या वाळूघाटांचा शोध घेऊन पारंपरिक पद्धतीने त्याखाली असलेल्या वाळूचा अंदाज काढून वाळू लिलावाची कार्यवाही पूर्ण करावी, तसेच बेकायदा मार्गाने होणारी वाळूचोरी रोखण्यासाठी टोल नाक्यावर 24 तास महसूल पथकांची नेमणूक करून वाळूतस्करांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना गमे यांनी जिल्हाधिकाऱयांना दिल्या.
नाशिक विभागात सनद वाटपाचे काम समाधानकारक असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मोहीम तीव्र करीत बांधकाम परवानगीचे प्रलंबित प्रकरणे, वनहक्क अधिनियम 2005 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, तसेच ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये तलाठी कार्यालय प्रस्तावित केले आहे, अशा ठिकाणी तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले.
कलम 155मधील 7/12 मधील दुरुस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावीत. ई-फेरफार आज्ञावलीची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी. अनधिकृत अकृषिक वापराच्या नोंदी घेऊन कार्यवाही करणे, तसेच इनाम व वतन जमीन शर्तभंग तपासणी व कार्यवाही करण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रांचा निपटारा करण्याच्या सूचनाही गमे यांनी दिल्या.
भूसंपादनाचा आढावा घेण्याच्या सूचना
महामार्ग भूसंपादन प्रक्रिया चालू असलेल्या प्रकरणामध्ये ताबा देण्यावर शिल्लक असलेल्या क्षेत्राबाबत जिल्हाधिकाऱयांनी आढावा घ्यावा, तसेच 31 जानेवारी 2021 पर्यंत शिधापत्रिकांचे आधार सीडिंगचे काम पूर्ण करावे. प्रत्येक जिह्यात घरकुल योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या.
दगडखाणींचे जादा उत्खनन झाल्यास त्वरित वसुली
दगडखाणींची ईटीएस मशीनद्वारे मोजणी करून परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झाल्यास तत्काळ कारवाई करून वसुली करण्यात यावी. जमीन महसूल वसुली शंभर टक्के होण्यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱयांनी आपल्या स्तरावर प्रत्येक आठवडय़ाला जिह्याचा आढावा घेण्याच्या सूचनाही गमे यांनी दिल्या.































































