
लखनऊमध्ये मोठ्या प्रमाणात कबूतरे पाळण्यात येतात. कबुतरे पाळणाऱ्यांना कबूतरबाज म्हणून ओळखले जाते. मात्र, देशभरात फैलावणाऱ्या बर्ड फ्लूमुळे लखनऊमधील कबूतरबाज धास्तावले असून ते आपल्या कबुतरांची काळजी घेत आहेत. कबुतरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कबुतरबाज त्यांच्या कबुतरांना बदाम आणि लवंगाचा खुराक देत आहेत.
कबुतरांना हा खुराक देण्यामुळे ते बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित राहतील, असे कबुतरबाजांनी सांगितले. उकळलेल्या पाण्यामध्ये बदाम आणि लवंगाची पावडर एकत्र करून तो खुराक कबुतरांना देण्यात येत आहे. बर्ड फ्लूपासून कबुतरांचा बचाव करण्यासाठी कबुतरांच्या खाण्यापिण्याकडे कबुतरबाज विशेष लक्ष देत आहेत.
प्रत्येक वर्षी हिवाळ्यात पक्ष्यांची विशेष काळजी घ्यावी लागते, असे कबुतरबाजांनी सांगितले. यावर्षी बर्ड फ्लूमुळे धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे घरगुती आणि पारंपारिक उपाय वापरून आम्ही कबुतरांचा या साथीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे काहीजणांनी सांगितले. या उपायांमुळे कबुतरांचा साथीपासून निश्चितच बचाव होईल, असे अलीम अहमद अब्बासी या कबूतरबाजाने सांगितले.
उकळलेले पाणी आणि बदामाची पावडर सकाळी कबुतरांना देण्यात येत आहे. त्यानंतर उकळलेल्या पाण्यात बदामाची पावडर आणि लवंगाची पावडर एकत्र करून ते कबुतरांना देण्यात येते, असे अब्बासी यांनी सांगितले. हा खुराक कबुतरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो, असे ते म्हणाले.
लखनऊमध्ये कबुतरांचा खेळ आयोजित करण्यात येतो. तो कबुतरबाजी नावाने ओळखला जातो. त्यात लखनऊमधील 25 क्लब सहभागी होतात. बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे हा काळ कबुतरबाजांसाठी खडतर असल्याचे क्लबमधील सदस्य राजेश यादव यांनी सांगितले. आमचे पक्षी सुरक्षित राहावेत यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. त्यामुळे या वर्षी एप्रिल मे महिन्यात आयोजित होणाऱ्या कबुतरबाजी स्पर्धेवर परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कबुतरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक तो खुराक त्यांना देण्यात येत आहे. तसेच त्यांचे पिंजरे आणि त्यांना ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणांचे सॅनिटायजेशनही करण्यात येत आहे. तसेच काहीजण गव्हाच्या पीठात बदाम आणि जायफळाची पावडर मिसळून ते कबुरांना देत आहेत. जायफळामध्ये अँटीफ्लू गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग होत असल्याचे मोहम्मद हैदर या कबुतरबाजाने सांगितले. तसेच कबुतरांना मल्टीविटामीन औषधेही देण्यात येत आहे. आमचे घराणे 90 वर्षांपासून कबुतरे पाळत आहे. त्यामुळे आम्हाला या घरगुती आणि पारपरिक खुराकावर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
कबुतरबाजी हा त्या काळातील नवाबांचा आवडता खेळ होता. त्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली असून आता तो खेळ लखनऊची ओळख ठरला आहे. कबुतरबाजीबरोबरच कोंबड्यांची झुंजही तेथील लोकप्रिय खेळ आहे. नवाबानंतर ब्रिटिशांच्या काळातही मनोरंजनासाठी हे खेळ होत होते, असे इतिहासतज्ज्ञ योगेश प्रवीण यांनी सांगितले. या खेळाची ही पंरपरा जोपासण्यासाठी कबुतरबाज आपल्या पक्ष्यांची काळजी घेत आहेत.

























































