सोन्याला पुन्हा झळाळी; चांदीचे दर 2 दिवसात 2000 रुपयांनी वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग पाच दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्याने शुक्रवारी सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. डॉलरचे दर स्थिर असल्याने शुक्रवारी सोन्याला झळाळी आली आहे. तर चांदीच्या किमतीत दोन दिवसात 2000 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच आठवड्याभराच्या मंदीनंतर शुक्रवारी शेअर बाजारही तेजीत आला आहे.

देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या किमती 48,819 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. तर वायदे बाजारातही सोन्याच्या दरात तेजी आली आहे. वायदे बाजारात 5 फेब्रुवारीच्या सौद्यांसाठी 48,624 रुपये प्रतिग्रॅमवर सुरू झाल्या आहेत. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. सकाळी 10.30 वाजता सोन्याच्या दरात 0.30 टक्क्यांनी म्हणजे 148 रुपयांची वाढ होत दर 48,772 रुपये प्रतिग्रॅमवर पोहचले होते.

चांदीच्या दरातही शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चांदीच्या किमती 68,641 रुपये प्रतिकेलोवर सुरू झाल्या होत्या. त्यात 1.28 टक्क्यांची म्हणजे 862 रुपयांनी वाढ होत त्या 68,457 रुपये प्रतिकिलोवर पोहचल्या आहेत. गुरुवारी बाजारात सोन्याच्या किमतीत 0.5 टक्क्यांची घट झाली होती. तर चांदीच्या दरात 1.8 टक्क्यांनी वाढ होत बाजार बंद झाला होता.

सराफा बाजारातही सोन्याच्या दरात तेजी आहे. राजधानी नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्यासाठी 52,130 रुपये दर होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किमत 48,790 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या. तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती 47,790 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या. दक्षिण हिंदुस्थानात सोने स्वस्त आहे. म्हैसूर, विजयवाडा, विशाखापट्टनम आणि बंगळुरुमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या किमती 45,640 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत तेजी दिसून आली. अमेरिकेच्या वायदे बाजारात सोन्याच्या दरात 0.1 टक्क्यांची वाढ दिसून आली. स्पॉट गोल्ड 1,840.91 डॉलर प्रति औंसवर होते. तर वायदे बाजारतही 1,839.70 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. मात्र, चांदीच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात घट झाली आहे. चांदीच्या दरात 0.7 टक्क्यांची घट होत ते 26.18 डॉलर प्रति औंसवर होते. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.