
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख यांच्या जयंतीनिमित्त के.एस.के.महाविद्यालय येथे युवासेना युवाजिल्हाधिकारी सागर बहिर यांनी स्पर्धा परीक्षा पूर्व सराव परीक्षेचे आयोजन केले होते. या सराव परीक्षेत 780 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांसह विद्यार्थीनींची देखील लक्षणीय उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सागर बहिर म्हणाले की, कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर ढकलले गेले होते. अशातच विद्यार्थ्यांना सराव म्हणून व त्यांच्या बुद्धीला अजून चालना देण्यासाठी युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. बीड जिल्हा युवासेना ही सदैव विद्यार्थ्यांच्या हितासाठी व त्यांच्या विविध प्रश्नांसाठी तत्पर असते. विद्यार्थ्यांनी आगामी काळात युवासेनेशी जोडून युवकांच्या हितासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
नगरसेवक शुभम धूत म्हणाले की, कोरोनाच्या काळात युवा सेनेने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले. त्यामध्ये गरजूंना किराणा किटचे वाटप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक रक्तदान शिबिरे घेतली. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दिलेल्या 80% समाजकारण व 20% राजकारण या शिकवणुकीवर शिवसेना व युवासेना मार्गक्रमण करत आहे. सध्या परीक्षा देत असलेले विद्यार्थी हेच भविष्यातील अधिकारी म्हणून उदयास येवो व आम्हाला त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभो अशी अपेक्षा नगरसेवक शुभम धुत यांनी व्यक्त केली.
या परीक्षा केंद्रावर शिवसेनेचे डॉ. योगेश क्षीरसागर, यशराज पंडित, आकाश जगताप यांनी भेट देत परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा सेनेचे सुरज चुंगडे, रवी शिंदे, शुभम कांतागळे, अजिंक्य पवळ, शुभम डाके, कृष्णा फरताळे, चंद्रसेन काळे, सूर्या राठोड, राहुल बहिर, शंभू औटे, रवी वखरे, अक्षय शिंदे व आदी उपस्थित होते.





























































