मुंबईचा ऑक्सिजन साठा वाढणार, 24 मियावाकी वनांमध्ये बहरली 1 लाख 62 हजार 318 झाडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची फुप्फुसे समजली जाणाऱया आरे जंगलाप्रमाणे आता मियावाकी झाडांचे जंगल मुंबईत तयार होत असून मुंबईचा ऑक्सिजन साठाही वाढणार आहे. मुंबई महापालिकेने गेल्या वर्षांपासून जपानी पद्धतीने मियावाकी वने विकसित करायला सुरुवात केली असून आतापर्यंत 24 मियावाकी वनांमध्ये तब्बल 1 लाख 62 हजार 398 झाडे बहरली आहेत तर येत्या काळात आणखी 40 मियावाकी वने विकसित होणार आहेत.

मुंबईला पर्यावरणपूरक बनवून पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणाऱया जपानी पद्धतीच्या ‘मियावाकी’ वने विकसित करण्याच्या अभिनव प्रकल्पाला 26 जानेवारी 2019 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या प्रकल्पांतर्गत गेल्या वर्षभरात महापालिका क्षेत्रातील विविध 64 ठिकाणी टप्प्याटप्प्याने ‘मियावाकी’ वनांची रुजवात करण्यात आली. यापैकी पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आलेल्या 24 ठिकाणच्या मियावाकी वनांनी आता चांगलेच बाळसे धरले आहे. या 24 ठिकाणी तब्बल 1 लाख 62 हज़ार 398 झाडे लावण्यात आली असून यापैकी बहुतांश झाडांनी अवघ्या वर्षभरातच चार ते पाच फुटांची उंची गाठली आहे. केवळ वर्षभरात या वनांमधील झाडांनी एवढी उंची गाठणे हे वनांची वाढ योग्य प्रकारे होत असल्याचे लक्षण आहे, अशी माहिती महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे देण्यात आली.

देशी, औषधी झाडांचाही समावेश

मुंबईत 24 ठिकाणी वाढत असलेल्या मियावाकी वनांमध्ये विविध 47 प्रकारची झाडे लावण्यात आली असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरू, बदाम, काजू, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यांसारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.