#Budget2021 वांझोट्या म्हशीला लेकरं चार… असाच हा अर्थसंकल्प! मंत्री विजय वडेट्टीवार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vijay-wadettiwar

‘ज्या देशात वित्तीय तूट साडेनऊ टक्क्यांवर पोचली, तर जीडीपी उणे सात आहे, तिथं हा अर्थसंकल्प म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. वांझोट्या म्हशीला लेकरं चार असल्यासारखा हा प्रकार आहे.’, असं म्हणत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्ष 2021 – 22 साठीचा Union Budget सादर केला. यामध्ये निर्गुंतवणुकीतून विकास साधण्याचे उद्दीष्ट असल्याचे अर्थसंकल्प मांडताना सांगण्यात आले. तसेच शेतमालाला दीडपट हमी भाव देण्यात येणार असल्याचा संकल्प असल्याचे म्हटले गेले. यावरून काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोदींना यावेळी लक्ष्य केलं.

‘सारं काही विकण्याचा सपाटा लावलाय. आता या देशाला कुणी वाचवू शकत नाही. त्यामुळं आता राम मंदिर बांधून श्रीरामाला देश वाचवण्याचे साकडे आता मोदी घालणार आहेत,’ असं यात दिसतं असं ही ते म्हणाले. पुढे बोलताना ‘देशातील लोकांच्या अपेक्षांना पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे. रोजगार गेला, उद्योग बुडाले. याला चालना देण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. शेतकऱ्यांना दीडपट भाव किंवा हमीभाव देण्याची भाषा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खिशात नाही दमडी आणि बाजार फिरते शेंबडी,’ अशा शब्दात त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.

या देशाची परिस्थिती ही बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षा कठीण झाली असल्याचे ते म्हणाले. नोटाबंदी, जीएसटी, कोरोना अशा संकटांमुळे बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असे या अर्थसंकल्पात काहीच नसल्याचेही ते म्हणाले.

बेरोजगार, शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं हिरावून घेणारा असा अर्थसंकल्प असून ईश्वर यांना सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो असंही त्यांनी सांगितलं.

कोविड काळात सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. त्यावरून ओरड सुरू असतानाच पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार वाढवला आहे. डिझेलवर 4 रुपये तर पेट्रोलवर 2.5 रुपये अधिभार आकारण्यात येणार आहे. मात्र याचा थेट बोजा ग्राहकांवर येणार नाही तर कंपन्यांना हा भार भरावा लागणार आहे असे सांगण्यात येत आहे.