दुसऱ्या कसोटीसाठी 50 टक्के प्रेक्षकांना एण्ट्री, हिंदुस्थान-इंग्लंड मालिकेची रंगत वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांसाठी सोमवारी एक खूशखबर आली. हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यानच्या दुसऱया कसोटीसाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळाली आहे. केंद्र सरकारने कोरोनाचे नियम पाळून क्रीडा स्पर्धांसाठी शंभर टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ आणि तामीळनाडू क्रिकेट असोसिएशनने (टीसीए) लागलीच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मोटेरा स्टेडियमवर होणाऱया तिसऱया कसोटीसाठी आधीच 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगीमुळे आता हे स्टेडियम हाऊसफुल होण्याची शक्यता बळावली आहे.

‘टीम इंडिया’ महिनाभर अहमदाबादमध्ये राहणार

कोरोनाच्या संकटामुळे हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यानच्या द्विपक्षीय मालिकेसाठी चेन्नई, अहमदाबाद व पुणे या तीन मैदानांचीच निवड केली आहे. 17 फेब्रुवारीला दुसरी कसोटी संपल्यानंतर ‘टीम इंडिया’ चेन्नईतून अहमदाबादला रवान होईल. अहमदाबादमध्ये उर्वरित दोन कसोटी आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. टी-20चा अखेरचा सामना 20 मार्चला होणार आहे. याचाच अर्थ महिनाभर ‘टीम इंडिया’ अहमदाबादमध्येच राहणार आहे.

चिदंबरम स्टेडिमवर येणार 25 हजार प्रेक्षक

हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. यातील पहिल्या दोन लढती या चेन्नईतील एम. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहेत. पहिली कसोटी रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र, दुसऱया कसोटीसाठी 50 टक्के म्हणजे 25 हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये सामना बघू शकतात. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 50 हजार आहे.

…म्हणून पहिल्या कसोटीस प्रेक्षक मुकणार

केंद्र शासनाने 29 जानेवारीला क्रीडा स्पर्धांसाठी शंभर टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली. पहिली कसोटी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. खुपच कमी वेळ असल्यामुळे पहिल्या कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी देता आली नाही, असे ‘बीसीसीआय’ व ‘टीसीए’ यांनी सांगितले. मात्र, दुसऱया कसोटीसाठी सर्व नियमांचे पालन करून प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे.