
मालवण नगरपरिषदेच्या आडारी येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी सकाळी येथील कचऱ्याच्या आगीत परिसरातील ट्रान्सफार्मर जळाल्याने लगतच्या नागरिकांची बत्ती गुल झाली. दरम्यान, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि पालिका कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. तसेच जेसीबीला बोलावून ट्रान्सफार्मरच्या बाजूला तसेच रस्त्यावर आलेले ढीग हटविण्यात आले.
वारंवार लागलेल्या आगीच्या घटना पाहता ही आग लावली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अज्ञातावर गुन्हे दाखल करा असे आदेश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
वारंवार लागणाऱ्या या आगीबाबत स्थानिक नागरिक संतप्त बनले. शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, बाबी जोगी, बाळू नाटेकर, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर यांनीही घटनास्थळी धाव घेत पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत उपस्थित पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
डम्पिंग ग्राऊंड मधील कचरा रस्त्यावर येत आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना सांगूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ही आग लागली. याला पालिका प्रशासन जबाबदार आहे. असे सांगत बाबी जोगी यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
मोकाट जनावरे डम्पिंग ग्राऊंडमध्ये घुसून कचरा इतरत्र पसरवतात. प्लॅस्टिकच्या पिशव्या उडुन रस्त्यांवर व खाजगी कुंपणात जातात. परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. शहरातून वाहून आणलेला कचरा योग्य ठिकाणी उतरवला जावा. ज्याठिकाणी उघडा भाग आहे तेथून कचरा इतरत्र पसरणार नाही याची काळजी घेतली जावी. ट्रान्सफार्मर आहे त्या ठिकाणी यापुढे कचरा ओतला जाऊ नये अशा सक्त सूचना नगराध्यक्ष यांनी दिल्या. तसेच ट्रान्सफार्मरचा काही भाग जळाल्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबत वीज वितरण अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
शहरातील कचरा प्रश्नी तसेच कचरा डम्पिंग यार्डला वारंवार लागलेल्या आगीचा प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतला आहे. पुढील महिनाभरात कचरा व्यवस्थापन सुरळीत होईल याबाबत प्रशासनास आदेश देण्यात आले आहेत. तसेच डम्पिंग यार्डला वारंवार लागत असलेल्या आगीबाबत गुन्हे दाखल करा असे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याचे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी माहिती देताना सांगितले.

































































