पंजाबमध्ये अकाली दल व काँग्रेस कार्यकर्त्यांत राडा, सुखबीर बादल यांच्या गाडीवर जमावाचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबच्या जलालाबादमध्ये सोमवारी अकाली दल व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर दोन पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. या वेळी एकमेकांवर दगड, विटा फेकण्यात आल्या तसेच गोळीबारही करण्यात आला. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव आहे. बादल यांच्या गाडीवर काँग्रेसनेच हल्ला केल्याचा अकाली दलाचा आरोप आहे.

नगरपरिषदेच्या निवडणूकीमुळे जलालाबादमधील राजकारण तापले आहे. अशातच सोमवारी अकाली दल आणि काँग्रेसच्या वादाला हिंसक वळण लागले. अकाली दलाचे नेते सुखबीर बादल हे आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी निघाले होते. यादरम्यान वाटेतच त्यांच्या गाडयांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. दगडफेक झालेल्या गाडीत बादल नव्हते. त्यामुळे ते बचावले. या वेळी प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर कार्यकर्त्यांनी बॅरिडकेड्स हटवून पळापळ सुरू केली. दगडफेक आणि गोळीबारात काहीजण जखमी झाले. या घटनेमुळे जलालाबादमध्ये प्रचंड तणाव असून परिसरात मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आहे.