ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याला जोडुनच पूर्वेकडे लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या पावनगडावर आज शिवकालीन दारुगोळ्याचा मोठा साठा सापडला. दिशादर्शक फलक लावण्यासाठी खड्डा खोदताना, चक्क एक-दोन नव्हे तर चारशेहून अधिक तोफगोळे सापडले आहेत. अजूनही तोफगोळे मिळण्याची शक्यता असून इतक्या मोठ्या प्रमाणात तोफगोळे सापडल्याची ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र चर्चा आणि उत्सुकता लागली आहे.
ऐतिहासिक पन्हाळा किल्ला आणि त्याचा रोमहर्षक इतिहास सर्वज्ञात आहे. याच किल्ल्याला लागून खास पूर्वेकडे नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनगड बांधुन घेतला. भक्कम तटबंदी, बुरुज तसेच तुपाची विहिर हे या पावन गडाचे वैशिष्ट्य आहे.
जखमी सैनिकांच्या जखमा भरून येण्यासाठी त्या काळी गायीच्या तुपाचा वापर केला जात असे. तुप साठवून ठेवण्यासाठी असलेली विहीर आजही पावनगडावर आहे. गड बांधताना बांधलेली दोन सुंदर दगडी मंदिरेही आज पाहायला मिळतात. जैवविविधता, बिबट्या आणि गवारेड्यांचा येथे वावर आहे.
दरम्यान, वनविभाग आणि टीम पावनगड संस्थेच्यावतीने येथे दिशादर्शक फलक लावण्यात येत असून यासाठी खड्डा काढताना त्यामध्ये हे तोफगोळे सापडले. इतक्या मोठ्या संख्येने शिवकालीन तोफगोळे सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून शिवभक्तांसह इतिहासप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दारू गोळ्याचे कोठारसुद्धा याठिकाणी असण्याचा अंदाज इतिहास संशोधकांकडुन व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत पुरातत्त्व खात्याला माहिती दिली असून पंचनामा सुरू आहे.रा त्री उशिरापर्यंत याबाबत पुरातत्व खात्याकडुन अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
गडकोट किल्ल्यांवरील उत्खनन शासन आणि पुरातत्व खात्याने करावे!
पावनगड हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधुन घेतला आहे.त्यामुळे याचे अनन्यसाधारण महत्त्व पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचा अनमोल ठेवा असलेला पावनगड संरक्षित स्मारक व्हावे अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून आपण करत आहोत. पण पुरातत्व खात्याकडुन नेहमीच वेळकाढूपणा करण्यात येत आहे. अनेक शिवप्रेमी संघटनांकडुन उत्साहाच्या भरात अनेक गडकोट किल्ल्यांवर अशाप्रकारे ऐतिहासिक ठेवा उजेडात आला आहे. तर काही किल्ल्यांवर दरवाजेही बसविण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रमुख गडकोटांवरील कसलेही खोदकाम हे शास्त्रीय पद्धतीने होणे गरजेचे आहे. शासनामार्फत पुरातत्व खात्याकडून अशाप्रकारे उत्खनन होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिली.
… तर हजारो तोफगोळे सापडतील – सुखदेव गिरी
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवप्रेमींच्या टीम पावनगड मार्फत गेल्या चार-पाच दिवसांपासून परिसरात फलक लावण्यात येत आहे. आज सकाळी खड्डा खोदताना अवघ्या एक फुटावर हे गोल दगड आढळल्याची माहिती मिळताच सुखदेव गिरी यांच्यासह शिवप्रेमींनी पुरातत्व खात्याला कळविले. तोपर्यंत 406 तोफगोळे सुरक्षितरित्या बाहेर काढले. पुरातत्व खात्याने याचा पंचनामा केला असून जमिनीच्या खाली एक ते दीड फुट खाली हजारो तोफगोळे असण्याची शक्यता अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य सुखदेव गिरी यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना व्यक्त केली. तसेच यासंदर्भात पुरातत्व खात्याकडे उत्खनन करण्याची मागणीही त्यांनी केली. ही जागा वनखात्याकडे असल्याने यासाठी वरिष्ठ स्तरावरुन परवानगी घ्यावी लागेल असे वनविभागाच्या अधिकारी प्रियांका दळवी यांनी सांगितल्याचे ही गिरी यांनी सांगितले.
































































