
कोविडचे लसीकरण वेगाने सुरू आहे. परंतु ब्रिटन, ब्राझीलमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता बेसावध राहू नका, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
राज्यातील कोरोना परिस्थितीविषयीचे सादरीकरण आज मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, समूह प्रतिकारशक्तीमुळे (हर्ड इम्युनिटी) आपल्याकडे लक्षणीयरीत्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे असे जर आपण मानत असू तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतरदेखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते हे लक्षात घ्या. सध्या चीनमधून पसरलेल्या मूळ विषाणूव्यतिरिक्त ब्राझिलियन, आफ्रिकन, यूके असे या विषाणूचे तीन आणखी स्ट्रेन असून आपल्याकडे ते पसरू नयेत म्हणून अधिक दक्षता घ्यावी लागेल व जागरूकता बाळगावी लागेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात सरसकट निर्बंध उठविणार नाही
दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण सुरू असले तरी आरोग्याचे नियम पाळत राहिले पाहिजे. कारण केंद्राने जरी चित्रपटगृहे व इतर काही बाबतीत निर्बंध बऱयापैकी शिथिल केले असले आणि महाराष्ट्रातदेखील आपण आता बऱयापैकी व्यवहार सुरू केले असले तरी आपण महाराष्ट्रात सरसकट सगळे निर्बंध उठविणार नसून काळजीपूर्वक जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
20 लाख प्रवासी मध्य रेल्वेवर
लोकल सर्वांसाठी सुरू केल्यावर 20 लाख प्रवासी मध्य रेल्वेवर तर 14 लाख प्रवासी पश्चिम रेल्वेवर नोंदवले गेले अशी माहिती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात मृत्युदर कमी झाला
राज्याचा मृत्युदर नोव्हेंबरमध्ये 2.26, डिसेंबरमध्ये 1.96 आणि जानेवारीत 1.63 टक्के इतका झाल्याची तसेच साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.51 टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दुसऱया स्ट्रेनमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक
यूकेमध्ये 20 जानेवारी या एकाच दिवशी 1820 मृत्यू झाले तर ब्राझीलमध्ये दररोज एक हजार मृत्यू होत आहेत. ब्राझीलमध्ये दररोज 50 हजार रुग्ण आढळत आहेत. जून-जुलैनंतर या देशांत समूह प्रतिकारशक्ती येऊन रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली होती. पण चार-पाच महिन्यांनंतर कोरोनाच्या दुसऱया स्ट्रेनचा संसर्ग आढळला जो की 70 टक्के संसर्ग जास्त पसरविण्याची क्षमता असलेला होता. नुकत्याच केलेल्या पाहणीत हा स्ट्रेन केवळ संसर्ग वेगाने पसरविण्यातच नव्हे तर 40 टक्के जास्त मृत्यू यामुळे होऊ शकतात इतका धोकादायक आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
काही जिह्यांवर अधिक लक्ष ठेवणार
कोविडचा आलेख घसरत असला तरी अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा , नंदुरबार, वर्धा, रत्नागिरी, गडचिरोली, नांदेड या जिह्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा वेग जास्त आहे तसेच चाचण्यांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
साडेतीन लाख जणांना लसीकरण
आतापर्यंत महाराष्ट्राला 18 लाख 2 हजार कोविशिल्ड, तर 1 लाख 70 हजार 400 कोव्हॅक्सिन अशा 19 लाख 72 हजार 400 लसी प्राप्त झाल्या आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 633 जणांना लस देण्यात आली आहे. त्यात 3 लाख 51 हजार 48 कोविशिल्ड तर 3 हजार 545 कोव्हॅक्सिन लसी आहेत अशी माहिती देण्यात आली.


























































