सांगली महापौर, उपमहापौरपदासाठी मोर्चे बांधणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली महापालिका महापौर व उपमहापौर पदासाठी 22 फेब्रुवारी रोजी निवडणूक होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्तांकडून लवकरच निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद खुले असल्याने सत्ताधारी भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

विद्यमान महापौर गीता सुतार व उपमहापौर आनंदा देवमाने यांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपत आहे. गेल्या आठवडय़ात महापालिका प्रशासनाने महापौर व उपमहापौरपदांच्या निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सीईओ जितेंद्र डुडी यांची नियुक्ती होणार आहे. डुडी यांनी 22आणि 23 तारीख उपलब्ध असल्याचे कळविले आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडी याचदिवशी होतील, अशी चर्चा सुरू आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज करण्याची मुदत 18 फेब्रुवारी असेल. त्यानंतर सलग तीन दिवस शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे 22 रोजी निवड होईल, असे सांगण्यात येत आहे.

भाजपमध्ये नाराजीचे पेव फुटले असून, विरोधकांनी या असंतुष्टांना जाळ्यात ओढण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे यंदा महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. सत्ताधारी भाजपमधून निरंजन आवटी, युवराज बावडेकर, स्वाती शिंदे, धीरज सूर्यवंशी यांची नावे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने यांनी तयारी चालवली आहे.