
पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये म्हणून पालिकेने आतापासून कंबर कसली असून मिठी नदीसह मोठय़ा नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये स्थायी समितीत तब्बल 132 कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना या वर्षी पावसाळ्यात कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पालिकेकडून एकूण 100 टक्के नालेसफाईच्या कामापैकी 70 ते 80 टक्के नालेसफाई पावसाळ्याआधी केली जाते, तर उर्वरित काम पावसाळा आणि पावसाळ्यानंतर सुरू असते. या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामासाठी पालिकेने यावर्षी मिठी नदीसह प्रत्येक परिक्षेत्रानुसार नालेसफाईसाठी निविदा मागवल्या होत्या. सद्यस्थितीत करण्यात येणाऱया नालेसफाईच्या कामांसाठी 132 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामात पालिकेने गाळाच्या मेट्रिक टनाच्या हिशेबाने कामाची किंमत ठरवली आहे. कंत्राटदारांना काढलेला गाळ मुंबईबाहेर टाकावा लागणार आहे. या कामात फक्त शहर विभागातील एफ उत्तर, जी दक्षिण आणि जी उत्तर या प्रभागांसाठी पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा तीन टक्के दराने कंत्राट देण्यात येणार आहे. तर इतर ठिकाणी पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा 13 ते 29 टक्के कमी दराने कंत्राट देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पालिकेने या कामाचा दर 2018 च्या किमतीनुसार ठरवला होता. त्यामुळे हे काम पालिकेला तुलनेने कमी दरात करून मिळणार आहे.
मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी 62 कोटी
मिठी नदीच्या साफसफाईचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. यासाठी पालिका 62 कोटी 42 लाख रुपये खर्च करणार आहे. यामध्ये कुर्ला टिचर्स कॉलनी ते वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंतच्या नालेसफाईसाठी 32 कोटी 50 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे कामही कंत्राटदार 20.79 टक्के कमी किमतीत करणार आहे. तर पवई फिल्टरपाडा ते टिचर्स कॉलनीपर्यंतच्या मिठी नदीच्या सफाईसाठी 29 कोटी 91 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे कामही अंदाजित दरापेक्षा 20.10 टक्के कमी दराने होणार आहे.
























































