
जालना जिल्ह्यातील अंबड -शहागड रस्त्यावर शहापूर येथून काम आटोपून अंबडकडे जात असताना प्रादेशिक वनविभागाच्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धधडक दिली. या अपघातत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आकाश पांडूरंग कासारे (रा. जालना) असे वनरक्षकाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडला.
अंबड तालुक्यातील शहापूर परिसरात प्रादेशिक वनविभागामध्ये कार्यरत वनरक्षक आकाश पांडुरंग कासारे (वय 31, जालना) हे आपल्या दुचाकीवरुन काम आटोपून शहापूरहून निघाले. सोबतच्या दोन वनपाल मजुरासह अंबड येथे जात असताना उसाचा रस घेण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे दोन वनपाल मजूर रसवंतीवर पुढे जाऊन थांबले.
पाठीमागून मोटार सायकलवर आकाश कासारे येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. याची माहिती वनपालांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या आकाश कासारे यांना अंबड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यांच्या दुचाकीला रिक्षाने धडक दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी रस्त्याच्या बाजूला कापूस वेचत असलेल्या महिला मजुरांनी सांगितले की, कासारे यांना रिक्षाने धडक दिली. त्यानंतर रिक्षाचालकाने रिक्षासह पळ काढल्याचे त्यांनी सांगितले. कासारे यांच्या पार्थिवावर जालना येथे शुक्रवारी रात्री अत्यंविधी करण्यात आला.





























































