
अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत दोन वेळा बलात्कार करणाऱया नराधम वृद्धाला प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी जन्मठेप व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. चंद्रकांत दत्तात्रय पेंडूरकर (वय 55, रा. उपवडेपैकी न्हाव्याची वाडी, ता. करवीर) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे.
आरोपी चंद्रकांत पेंडूरकर याने 14 डिसेंबर 2016 रोजी व त्या अगोदर एकदा अल्पवयीन मुलीस शाळेच्या खोलीत नेऊन अत्याचार केला. यातून मुलीस गर्भधारणा झाल्याने हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. आईने करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले यांनी तपास केला. पीडित मुलगी, आई, वैद्यकीय अधिकारी अशा 11 जणांची साक्ष झाली. सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी खटल्याचे काम पाहिले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी पेंडूरकर याला दोषी ठरवून जन्मठेप व 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.



























































