
अमेरिकेची सुपरमॉम सेरेना विल्यम्स, जपानची नाओमी ओसाका आणि रोमानियाची सिमोना हालेप या मानांकित खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीत अव्वल मानांकित नोवाक जोकोविच व तृतीय मानांकित डॉमनिक थीम यांनीही प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पाडाव करून आपल्या अभियानास प्रारंभ केला.
दहावे मानांकन असलेल्या सेरेनाने पहिला गेम गमविल्यानंतर लढतीत धडाकेबाज पुनरागमन करीत बाजी मारली. तिने जर्मनीच्या लॉरा सीजमुंड हिचा 6-1, 6-1 असा धुव्वा उडविला. अनुभवी सेरेनाने आपल्या सर्व्हिसवर केवळ 9 गुण गमावले, तर 16 विनर्स लगावले. सेरेनाची मोठी बहीण 40 वर्षीय व्हीनस विल्यम्सनेही बेल्जियमच्या कर्स्टन फिलिपकेन्स हिचा 7-5, 6-2 असा पराभव करून दुसऱया फेरीत प्रवेश केला. तृतीय मानांकित नाओमी ओसाका हिने रशियाच्या अनास्तासिया पावल्युचेनकोवा हिला 6-1, 6-2 असा बाहेरचा रस्ता दाखवला. द्वितीय मानांकित सिमोना हालेप हिने ऑस्ट्रेलियाच्या लिझेट्टे पॅबरेरा हिला 6-2, 6-1 असे हरविले.
पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविचने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीचा दीड तासाच्या खेळात 6-3, 6-1, 6-2 असा पराभव करून विजयी सलामी दिली. ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने कझाखस्तानच्या मिखाईल पुपुशकीनचा 7-6(7/2), 6-2, 6-3 असा पराभव करुन आगेपूच केली.
मॉनफिल्सला पराभवाचा धक्का
ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद झाली. स्पर्धेत दहावे मानांकन असलेल्या गेल मॉनफिल्सला जागतिक क्रमवारीत 86व्या स्थानी असलेल्या फिनलॅण्डच्या इमिल रुसुव्वोरी याने 3 तास 46 मिनिटांपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत 3-6, 6-4, 7-5, 3-6, 6-3 असे पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत हरविले. ही मॅरेथान लढत 3 तास 46 मिनिटांपर्यंत रंगली.






























































