
राज्यात 50 ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल उभारण्याचा विचार असून मुंबईत त्यासाठी जागेची टंचाई असल्याने शाळा आणि कॉलेजातील मोकळ्या जागांवर अशी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर उभारता येतील का याची चाचपणी केली जाणार असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी येथे सांगितले.
शाळा आणि कॉलेजातील मोकळ्या जागांचा वापर शनिवार -रविवार सुट्टीच्या दिवसात मोटर ट्रेनिंग स्कूलसाठी करण्याचा विचार असल्याचे यावेळी अविनाश ढाकणे यांनी सांगितले. ज्या शैक्षणिक संस्था स्वतः मोटर ट्रेनिंग सेंटर चालविण्यासाठी उत्सुक असतील त्यांनाही यासंदर्भात प्राधान्याने मंजुरी देण्यात येईल असेही परिवहन आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.
राज्यात आरटीओचे सर्व व्यवहार ऑनलाइन करण्यासंदर्भात नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरशी (एनआयसी) बोलणी सुरू आहेत. शिकाऊ वाहन परवान्यासाठी ‘ई-साइन’ सारखी यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती. त्यास 700 जणांचा प्रतिसाद मिळाला होता. आता आधारकार्ड क्रमांक आधारित सर्व प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळण्यासाठीची डिजिटल ‘ई-साइन’ यंत्रणा सी-डॅक तसेच एनआयसीमार्फत उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
ड्रायव्हर ट्रेनिंगसाठी 65 सिम्युलेटर्स मंजूर
ड्रायव्हरच्या प्रशिक्षणासाठी परिवहन खात्याकडेडी आता ‘सिम्युलेटर्स प्रशिक्षण यंत्रणा’ उपलब्ध होणार आहे. आयआयटीच्या प्रोफेसरांच्या मदतीने एपूण 65 सिम्युलेटर्स राज्यभरातील आरटीओ कार्यालय आणि अन्य ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.
राज्यात 22 ठिकाणी टेस्ट ट्रक
मुंबई (मध्य), मुंबई (पश्चिम), मुंबई (पूर्व) ठाणे (नांदिवली), ठाणे (मर्फी), पनवेल, पेण, पुणे (आळंदी), पुणे (सासवड), पुणे (हडपसर) धुळे, अमरावती, अमरावती (बडनेरा), नागपूर (शहर), नागपूर (ग्रामीण), नाशिक, नांदेड, लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर, कराड, नागपूर (ग्रामीण) आदी 22 ठिकाणच्या ड्रायव्हिंग टेस्ट ट्रक उभारण्यात येणार आहेत.



























































