सावधान! वधू आणि वरपक्षांना गंडवणारी मध्यस्थांची टोळी कार्यरत, 2 ते 5 लाखात ठरतोय सौदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

शासकीय नोकरी नाही, शेती आहे परंतु मुलगी कोणी देत नाही या विवंचनेत असलेल्या मुलांना आता सीमावर्ती कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा मधील मुलींसोबत लग्न लावून देण्यासाठी मध्यस्थांची टोळीच कार्यरत आहे.

लग्न जमवण्यासाठी 2 ते 5 लाखाचा सौदा केला जात आहे. त्याशिवाय मुलगी दाखवण्यासाठी मुलास आणि त्याच्या पालकांना प्रचंड लुटले जात आहे. परंतु सांगता येईना आणि सहनही होईना अशी अवस्था अनेकांची झालेली आहे.

महाराष्ट्रात मुलांचे लग्नाचे वय होऊन जात आहे. शिक्षण आहे, परंतु नोकरी नाही, नोकरी आहे. परंतु शासकीय नाही, खासगी नोकरी असल्याने कोणी विचार करत नाही, अशी विविध कारणे यापाठीमागे आहेत. याचा फायदा कांही लग्न जमवणारे घेत आहे. लग्न जमवणारी ही एक टोळीच कार्यरत आहे. या टोळीचे कार्यक्षेत्र लातूर, धाराशीव, बीड, सोलापूर, परभणी, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यात पसरलेले आहे. लग्न लवकर होत नसलेले तरुण आणि त्यांचे हे या टोळीचे ग्राहक आहेत. मुलगा आणि त्याच्या पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन लग्नासाठी 2 लाख ते 5 लाखांपर्यंतचा सौदा केला जातो. त्याप्रमाणे मुलीच्या कुटुंबीयांनाही रक्कम द्यावी लागेल असे सांगीतले जाते.

मुलगी दाखवण्यासाठी घेऊन जाण्यापूर्वी चारचाकी वाहनातून मुलगा आणि त्याच्या पालकांना जवळच्या नातलगांना घेऊन जाण्यात येते. मुलगी दाखवण्यासाठी सोबत जाताना संबंधित गुत्तेकरी आपले 5 ते 7 हजार स्वतंत्र अगोदरच घेऊन नंतरच गाडीत बसतो. 100 ते 150 किमीच्या अंतरासाठी जाणीवपूर्वक किमान 400 ते 500 किलोमीटर अकारण फिरवले जाते. या काळात जेवण, चहापाणी, नाश्ता असा सर्व खर्च मुलाकडच्या मंडळींना सहन करावा लागतो ते वेगळेच.

त्यानंतर ज्या गावातील मुलगी दाखवायची असते त्या गावातील एखादा दलाल पुरुष किंवा महिला यांना सोबत घेतले जाते त्यांना एक मुलगी दाखवण्यासाठी 1 हजार रुपये द्यावे लागतात. ती रक्कम दिल्यानंतरच मुलगी दाखवण्यात येते. विशेष म्हणजे एका दिवशी एका मुलीसाठी पाच ते सहा जणांना दाखवण्याचे नियोजन केलेले असते.

मुलगी पसंत आहे असे सांगितल्यानंतर मुलीच्या अंगावर सोने घालावे लागेल, मुलीच्या घरच्यांना 1 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत रोख रक्कम द्यावी लागेल तसेच मुलीच्या नावावर घर, जमिन करावी लागेल अशा अटी टाकल्या जात आहेत. एखाद्याने लग्न करुन मुलगी आणलीच तर ती मुलगी तीन महिण्याच्या आतच सोडून जात असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे सध्या लग्न जमवणाऱ्या या भामटया मंडळीपासून सावधान रहावे असे म्हणण्याची वेळ अनेकांवर आलेली आहे.

सीमवर्ती भागातील तरुण व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्या भागातील गरीब मुलीच्या मात्यापित्यांना या भागातील मुलांना मुली देण्यापेक्षा मराठवाड्यातील मुलांना मुली देण्यासाठी अमिषे दाखऊन राजी केले जाते. लग्नासाठी तुम्हाला कसलाच खर्च होणार नाही, सर्व खर्च तेच करतील. उलट पक्षी मुलीच्या अंगावर ते सोने घालतील, मुलगी सुखात नांदेल असे सांगून त्यांच्या परस्पर दलाल मंडळी दलाली घेऊन लग्ने जमवण्याचे काम करीत आहेत असे दिसून येत आहेत.