किरकोळ कारणावरून टोळक्याचा तरुणावर कोयत्याने वार, बुधवार पेठेतील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ कारणातून सात जणांच्या टोळक्याने तरूणावर कोयते आणि पालघनने जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील विष्णूपुरावाडा परिसरात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

शाहिद आरिफ बागवान (वय 22), शोयब आरिफ बागवान (वय 24) अशोक संतोष सिंग (19) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमन चव्हाण आणि त्याचे इतर दोन साथीदार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी निखिल शिखर तोरडमल (वय 22) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी आरोपींनी निखीलला सुरज जाधव कोठे आहे असे विचारले होते. परंतु निखीलने त्यांना सुरजबाबत न सांगितल्यामुळे टोळक्याने त्याला बुधवार पेठेतच बेदम मारहाण केली.

त्यानंतर कोयता, पालघन सारख्या घातक शस्त्राने निखीलच्या उजव्या कानावर, डाव्या हातावर, दंडावर वार केले. त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील तपास करीत आहेत.