
चीनचा खोटारडेपणा अखेर चव्हाटय़ावर आला आहे. डिसेंबर 2019मध्ये वुहान शहरातूनच कोरोना विषाणूचा मोठय़ा प्रमाणावर पैलाव झाला. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तपास पथकाच्या हाती काही पुरावे लागले आहेत. त्यातून कोरोना फैलावाचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकन वृत्तवाहिनी ‘सीएनएन’च्या वृत्तामध्ये हा दावा करण्यात आला आहे.
डब्ल्यूएचओच्या पथकातील प्रमुख तपास अधिकारी पीटर बेन एम्बार्क यांनी एका मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला. आम्हाला वुहानमधून कोरोनाचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाल्याचे संकेत मिळाले आहेत. वुहानमध्ये डिसेंबर 2019च्या आधीपासूनच कोरोनाचे डझनभर स्ट्रेन अस्तित्वात होते, असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा उगम शोधण्यासाठी डब्ल्यूएचओचे पथक चीनच्या दौऱयावर आहे. वुहानमध्ये कोरोना उत्पत्तीचे पुरावे हाती लागल्याने चीन डब्ल्यूएचओच्या रडारवर आला आहे. बाहेर कुठेही प्रवास न केलेल्या 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे 8 डिसेंबर 2019 रोजी उघडकीस आले होते. डब्ल्यूएचओच्या पथकाने त्या पहिल्या कोरोनाग्रस्ताशी संवाद साधला आहे.
हजारो लोकांचे रक्त नमुने देण्यास चीनची टाळाटाळ
जानेवारीत चीनमध्ये पोहोचलेल्या डब्ल्यूएचओच्या पथकाने चार आठवडे कोरोना उत्पत्तीचा शोध घेतला. चीनने या पथकाला हजारो रहिवाशांचे रक्त नमुने तपासायला दिलेले नाहीत. त्यामुळे चीनच्या भूमिकेवर संशय वाढला आहे. डब्ल्यूएचओने चीनला संबंधित रहिवाशांचे नमुने तत्काळ सादर करण्यास सांगितले आहे.
याच आठवडय़ात अहवाल सादर करणार – टेड्रोस
वुहान शहरातील झडती महत्त्वाची आहे. आम्ही सर्व शक्यता गृहीत धरून चौकशी करतोय. आमचे पथक याच आठवडय़ात आपला प्राथमिक अहवाल सादर करेल. तसेच काही आठवडय़ानंतर अंतिम अहवाल सादर केला जाईल, असे डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधेनॉम गेब्रेसियस यांनी सांगितले.




























































