
सेलिब्रिटी ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार असून आतापर्यंत 12 जणांची ओळख पटल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सेलिब्रिटी ट्विट चौकशी प्रकरणात माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला. भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर ही आमची दैवते आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीचा प्रश्नच निर्माण होत नाही. चौकशी होणार, पण ती भाजपच्या आयटी सेलची, असे देशमुख म्हणाले.
पूजा चव्हाण प्रकरणात कोणताही दबाव नाही
राज्याचे वन मंत्री संजय राठोड प्रकरणात पुणे पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही, मुळात दबावाचा प्रश्न येत नाही. नियमानुसार चौकशी होईल. या प्रकरणात जे कुणी दोषी आढळतील त्यानुसार कारवाई केली जाईल. राठोड यांच्यावर नियमानुसार चौकशी केली जाईल, पण विरोधी पक्ष जे आरोप करीत आहे त्यात काही तथ्य नाही, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

































































