आभाळमाया – द्वैती किंवा जोडतारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

2004 मध्ये आपल्या ग्रहमालेत 1930 पासून नववा ग्रह मानल्या गेलेल्या प्लुटोचे ‘ग्रहपद’ जाऊन त्याला खुजा ग्रह घोषित करण्यात आले. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्लुटोचा ‘उपग्रह’ असलेला शेरॉनसुद्धा आकाराने मोठा असून त्या दोघांमधील गुरुत्वबिंदू कोणा एका ‘ग्रहा’त सामावलेला नाही. चंद्राचा गुरुत्वबिंदू पृथ्वीमधे असल्याने तो जोडग्रह न ठरता उपग्रह ठरतो. प्लुटो आणि शेरॉन यापैकी कोण कोणाभोवती फिरतो? असा प्रश्न असल्याने दोघेही खुजे ग्रह ठरविण्यात आले.

जुळ्या किंवा जोडग्रहांच्या अशा जोडय़ांप्रमाणेच अनेक ताऱयांच्याही जोडगोळय़ा असतात. किमान 100 अब्ज तारे एका दीर्घिकेत (किंवा आकाशगंगेत) सामावलेले असतात. ही संख्या 200 अब्जांपर्यंतही जाते आणि एवढय़ा प्रचंड संख्येने तारे बाळगणाऱया अब्जावधी दीर्घिका आपल्या विश्वाच्या पसाऱयात आहेत. यावरून विश्वाच्या व्यापकतेची कल्पना येईल. आकाश निरीक्षण करताना एका वेळी सुमारे 3 हजार आणि रात्रभरात 6 हजार तारे चमचमताना दिसतात हे आपण मागच्या लेखात पाहिले, परंतु दुर्बिणीतून आणि शक्तीशाली दुर्बिणीमधून अवकाशाचा वेध घेतला की, सुमारे 50 टक्के तारे हे ‘द्वैती’ किंवा जोडतारे असल्याचं लक्षात येतं. काही वेळा तर तीन, चार किंवा त्याहून जास्त ताऱयांचा समूह एकत्रितपणे ‘वावरतो’ असे लक्षात येते.

ताऱयांच्या या जोडगोळय़ा परस्परांभोवती फिरतात. त्यांचा परस्पर परिक्रमा करण्याचा कालावधी काही तासांपासून काही वर्षांपर्यंत असू शकतो. काही वेळा ताऱयांच्या वर्णपटातील रेषा परस्परसापेक्ष सरकताना दिसतात असे द्वैती तारे एकमेकांच्या अधिक निकट असतात. त्यामुळे दुर्बिणीतूनही त्यांचे वेगळेपण जाणवत नाही. मात्र त्यांच्या वर्णपटातील बदलावरून त्यांचे सहअस्तित्व ठरवता येते. अशा जोडताऱयांना वर्णालीय द्वैती असं म्हणतात.

दोन तारे परस्परांभोवती फिरतात तेव्हा एक तारा दुसऱयाला ‘ग्रहण’ लावू शकतो. असे झाले की, त्या दोघांची एकत्रित तेजस्विता कमी-जास्त होताना पाहायला मिळते. त्यांना विधानकारी जोडतारे (एक्लिप्सिंग बायनरी) असं म्हटलं जातं. काही जोडताऱयांच्या भ्रमणकाळात त्यांच्यात एक प्रकारची स्पंदनं जाणवतात. त्यांना ऍस्ट्रोमेट्रिक द्वैती असं म्हटलं जातं. आकाशात रात्री दिसणारा सर्वात तेजस्वी आणि ‘मृगा’च्या कथेशी निगडित असलेला ‘व्याध’ तारा असा ‘थरथराटी’ वैती आहे. काही जोडतारे अनेक असतात. तेही परस्परांभोवती फिरतातच. ही अनेक ताऱयांची (मल्टिपल) प्रभावळ तेजाने भारलेली असते. मिथून राशीतला कश (किंवा कॅस्टर) अशा गुणित ताऱयांपैकीच आहे.

अनेक जोडतारे दुर्बिणीतून न्याहाळताना त्यांच्या रंगसंगती – विसंगतीमुळे अत्यंत सुंदर दिसतात. ही रंगप्रभा वेगवेगळय़ा ताऱयांच्या पृष्ठभागावरील निराळय़ा तापमानामुळे निर्माण होते. जोडताऱयांइतकेच महत्त्वाचे असतात ते रूपविकारी (व्हेरिएबल) तारे. अशा ताऱयांच्या अस्थिरपणामुळे त्यांच्या तेजस्वितेमध्ये फरक पडत जातो. यामध्येही विविध प्रकार असून स्पंदक (पल्सेटिंग) रूपविकारी खूप महत्त्वाचे मानले जातात. लिमिंगल (सीटस) तारकासमूहातला मीरा हा तारा महाप्रचंड आहे. अशा ताऱयांचा ‘रूपविकार’ 80 ते 1000 दिवसांचा असू शकतो.

आपल्या संस्कृतीशी निगडित असे जोडतारे ‘सप्तर्षी’ (अर्सा मेजर) या तारकासमूहात दिसतात. भव्य पतंगाच्या आकाराचा हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील मोठा तारकासमूह खूपच प्रसिद्ध असून ध्रुवतारा ओळखण्यासाठी यातील दोन ताऱयांचा उपयोग होतो. हा तारकासमूह आकाशात नसतो तेव्हा शर्मिष्ठा (कॅसिओपिया) तारकासमूहावरून ‘ध्रुव’ निश्चित करता येतो.
‘सप्तर्षी’मधील सात ताऱयांना सात ऋषींची नावे देण्यात आली आहेत. क्रतू, पुलह, पुलस्य, अत्री, अंगिरा, वसिष्ठ आणि मरिची असे हे सात तेजस्वी तारे. यापैकी पहिल्या क्रतू व दुसऱया पुलह ताऱयांना जोडणारी रेषा ध्रुवताऱयाकडे जाते व उत्तर दिशा समजते. क्रतू तारा द्वैती किंवा जोडतारा आहे.

त्यानंतरचा सप्तर्षीतला प्रसिद्ध जोडतारा वसिष्ठ. यामध्ये वशिष्ठ आणि अरुंधती अशी पती-पत्नींची जोडी आहे. वसिष्ठ (मिझार) आणि अरुंधती (अल्कॉर) या ताऱयांची जोडी छोटय़ा द्विनेत्रीतून (बायनॉक्युलर) छान दिसते. शक्तीशाली दुर्बिणीतून तर या जोडप्याचा ‘संसार’ फारच अप्रतिम दिसतो.

या दोन ताऱयांची बरीच वैशिष्टय़े आहेत. परस्परांभोवती संयमाने फिरणारे हे तारे 10 हजार वर्षांत एकमेकांची परिक्रमा करतात. 1650 मध्ये रिकोली यांनी दुर्बिणीतून या जोडीचे पहिल्यांदा निरीक्षण केले हे खरे, परंतु फार पूर्वीपासून आपल्याकडे नवपरिणित वधू-वरांना (भरदिवसा) वसिष्ठ – अरुंधती दाखवून त्यांच्या दृष्टीची परीक्षा घेतली जात असे! 1857 मध्ये या द्वैती ताऱयांचे पहिले छायाचित्र घेण्यात आले. ‘वसिष्ठा’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे आधी उल्लेख केलेल्या वर्णालीय (स्पेक्ट्रोस्कोपिक) पद्धतीने शोधला गेलेला पहिलावहिला वर्णालीय द्वैती तारा. वसिष्ठ – अरुंधती नुसत्या डोळय़ांनी रात्रीही जेमतेम दिसतात. त्यांचा वेध घेणे म्हणजे खरोखरच दृष्टिपरीक्षा. त्यात ‘पास’ झालं तर रात्रीचं आकाश हजारो ताऱयांसह निरीक्षकाची प्रतीक्षाच करत असतं!