
विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचे मागील 40 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यासमोर या शिक्षकांनी आंदोलनाचा प्रयत्न केला. या शिक्षकांच्या प्रश्नांची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार उपसभापती डॉ. नीलम गोऱहे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेतली. यावेळी येत्या चार ते पाच दिवसांत विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सरकार ठोस निर्णय घेईल. यासाठी घसघशीत निधीची तरतूद सरकार करेल, असे आश्वासन उपसभापती नीलम गोऱहेयांनी या शिक्षकांना दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार या शिक्षकांची भेट घेऊन उपसभापती नीलम गोऱहे यांनी या शिक्षकांना दिलासा दिला. कोरोना संसर्ग वाढत असल्याने आपला जीव धोक्यात घालून हे आंदोलन सुरू ठेवू नये. सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असून येत्या चार दिवसांतच यावर निर्णय होईल. तेव्हा आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना त्यांनी केले. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून माहिती घेतली असल्याचे नीलम गोऱहे यांनी यावेळी सांगितले.
कायम शब्द काढण्यासाठी शिवसेना आग्रही
विनाअनुदानित शाळांबाबत निर्णय घेताना जो कायम हा शब्द लावण्यात आला त्यावेळी शिवसेना आमदारांनी हा शब्द लावण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली होती, याची आठवण नीलम गोऱहे यांनी करून दिली. शिवसेना आणि हे सरकार कायम शिक्षकांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. या शाळांना अधिकाधिक अनुदान कसे मिळेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अघोषित शाळांबाबतही शाळेच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः यात लक्ष घातले आहे, अशी माहिती नीलम गोऱहे यांनी दिली.



























































