माजी मंत्र्याच्या कॉलेजमधून बेपत्ता झालेली तरूणी जळालेल्या अवस्थेत सापडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये एका कॉलेजमधून बेपत्ता झालेली तरुणी महामार्गावर होरपळलेल्या अवस्थेत आढळली. तरुणी ज्या कॉलेजमध्ये शिकत होती ते कॉलेज भाजपचे माजी मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्या ट्रस्टकडून चालवले जात आहे. हे तेच चिन्मयानंद आहेत ज्यांच्यावर यापूर्वीच बलात्काराचे आरोप झालेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी अकरा वाजता तरुणीच्या वडिलांनी तिला स्वामी सुखदेवानंद कॉलेजमध्ये लेक्चरसाठी सोडले.  दुपारी तीन वाजता तिचे कॉलेज सुटणार होते, दुपारचे तीन वाजले तरी ही तरुणी कॉलेजमधून बाहेर पडली नाही. घाबरलेल्या वडिलांनी तिला तीन तास शोधले पण ती सापडली नाही. नंतर दिल्ली-लखनऊ महामार्गाजवळ ही तरुणी जळालेल्या अवस्थेत सापडली. या तरुणीच्या अंगावर एकही कपडा नव्हता, त्यामुळे तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही असं पोलिसांनी म्हटले आहे.

या तरुणीच्या घरच्यांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. ही तरुणी 60 टक्के भाजल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता पोलिसांना दिसून आलं आहे की जेव्हा ही तरुणी कॉलेजबाहेर पडली होती तेव्हा ती एकटीच होती, तिच्यासोबत कोणीच नव्हते.

या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तिच्या मित्रावर संशय व्यक्त केला आहे. त्या मुलानेच आपल्या मुलीला जाळल्याचे वडिलांनी म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस मुलीचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला पण मुलगी बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याने त्यांना तो नोंदवता आलेला नाहीये. पोलिसांनी या तरुणीच्या मैत्रिणींकडे चौकशीला सुरूवात केली आहे.