
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या गुजरातमधील मोटेरा येथील ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम’हे हटवून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. हिंदुस्थान-इंग्लंड संघामध्ये आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अचानक ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असा नामकरण सोहळा पार पडला. यावरून आता भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव असताना स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देणे हे कोणाला ‘पटेल’? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
आज राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते झालेल्या सोहळ्यात नरेंद्र मोदी स्टेडियम असे नामकरण केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवक्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू, बीसीसीआयचे सचिव जय शहा आदी उपस्थित होते. या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये ऑलिंम्पिक दर्जाचे स्विमींग पूल, बॉक्सिंग, बॅडमिंटन, टेनिस आदी खेळासाठी कोर्ट मैदाने असणार आहे. फुटबॉल, हॉकीसाठीही मैदान असेल. या संपूर्ण परिसराला ‘सरदार पटेल स्पोर्टस् इनक्लेव्ह’ असे नाव देण्यात आले आहे. त्याचे भुमिपूजन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाल्याचे गुजरातचे क्रिकेट असोसिएशनने सांगितले.
‘नमस्ते ट्रम्प’ आणि नामकरणाचा योगायोग
वर्षभरापूर्वी 24 फेब्रुवारी 2020 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थान दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ट्रम्प यांच्या स्वागताचा कार्यक्रम याच स्टेडियममध्ये झाला होता. ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम आणि ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे नामरकरण याची तारीखही योगायोगाने एकच आहे.
असे आहे स्टेडियम
- मोटेरा येथे 1982 मध्ये स्टेडियम बांधण्यात आले होते. 2015 मध्ये हे स्टेडियम पूर्णपणे पाडण्यात आले आणि नव्याने त्याची निर्मिती करण्यात आली.
- आधुनिक सुविधा असलेले हे स्टेडियम 63 एकरवर आहे. 800 कोटी रुपयांचा खर्च करून हे स्टेडियम बांधले आहे.
- जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या या स्टेडियमची आसनक्षमता 1 लाख 32 हजार इतकी आहे. पूर्वी 53 हजार प्रेक्षक बसू शकत होते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्टेडियमची आसनक्षमता 90 हजार आहे.
- या मैदानावर दिवस-रात्र क्रिकेट सामना खेळले जाऊ शकतात. सध्या इंग्लंडबरोबरची कसोटी दिवस-रात्र सुरू आहे.
फक्त स्टेडियमचे नाव बदलले; कॉम्प्लेक्सला सरदार पटेल यांचे नाव राहणार – केंद्र सरकार
सरदार पटेल यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आल्यामुळे प्रसारमाध्यम आणि प्रसारमाध्यमात तीक्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर केंद्र सराकरच्या वतीने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रवीशंकर प्रसाद यांनी खुलासा केला आहे. फक्त मोटेरा स्टेडियमचे नाव बदलले आहे. संपूर्ण स्पोर्टस् कॉम्प्लेक्सला सरदार पटेल यांचे नाव कायम असेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी काँग्रेसवर टीका केली. सरदार पटेल यांच्याविषयी सन्मान व्यक्त करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अन्य नेत्यांनी केवडियाला कधीही भेट दिलेली नाही. पण आता ते नेते सरदार पटेलांचा अपमान केल्याचे बोलत आहेत, असे रवीशंकर प्रसाद म्हणाले.
मोदींचे स्वप्न पूर्ण – शहा
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वांत मोठय़ा स्टेडियमचे स्वप्न बघितले होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले, असे गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी सांगितले.
‘भाजपच्या मातृ संघटनेवर (संघ) बंदी घालणाऱ्या गृहमंत्र्यांच्या (सरदार पटेल) नावाने हे स्टेडियम असल्याचे भाजपच्या लक्षात आले असावे किंवा ट्रम्प यांच्याप्रमाणे दुसऱ्या देशाच्या प्रमुखाचे आदरतिथ्य करण्यासाठी ही ऍडव्हॉन्स बुकिंग असावी.’
- शशी थरूर, काँग्रेस खासदार
सरदार पटेल यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले. हा सरदार पटेलांचा अपमान नाही का? सरदार पटेलांच्या नावावर मते मागणारी भाजप आता सरदार पटेल यांचा अपमान करत आहे. गुजरातची जनता हा अपमान सहन करणार नाही.
- हार्दिक पटेल, काँग्रेस नेते
सत्य स्वतःच सुंदरतेने प्रकट होते. नरेंद्र मोदी स्टेडियम. जय शहांच्या अध्यक्षतेखाली ‘अदानी एंड आणि रिलायन्स एंड़’ हे तर ‘हम दो हमारे दो!’
- कॉँग्रेस नेते राहुल गांधी























































