
सातारा जिल्हावासीयांनी कोरोनाच्या दुसऱया इनिंगचा धसका घेतला आहे. जिह्यातील जवळपास 15 शाळांमधील 49 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यामुळे पालकवर्ग धास्तावला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सावधानतेच्या उपाययोजना करून शाळांची घंटा वाजली खरी; पण आता 15 शाळांमध्येच कोरोनाचा शिरकाव झाल्याने सर्वच शाळांसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील जिव्हाळा दिव्यांग निवासी शाळेतील 42 विद्यार्थ्यांसह 8 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकावेळी एकाच ठिकाणी 50 जणांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, जि. प. चे वैद्यकीय अधिकाऱयांचे पथक अंत्रोळी गावात दाखल झाले असून, तपासणी सुरू केली आहे.
वाशीम जिल्हय़ात रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेच्या वसतिगृहातील 229 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा हा बॉम्बगोळा फुटताच प्रशासन हादरून गेले. वसतिगृहाच्या इमारतीलाच कोविड सेंटर बनवण्यात आले असून जिल्हाधिकारी एस. षण्मुखराजन आणि जिल्हा परिषदेचे सीईओ मंगेश मोहिते यांनी शाळेला तातडीने भेट दिली.

























































