संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या प्रकरणातून सत्य बाहेर यावे यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया संजय राठोड यांनी राजीनाम्यानंतर दिली.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाआधी संजय राठोड यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सपत्नीक भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राठोड म्हणाले, विरोधी पक्षाने घाणेरडे राजकारण करून माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

मी ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतो त्यातील बंजारा समाजाच्या एका मुलीने आत्महत्या केली. त्याचा संबंध माझ्याशी जोडून मला गुन्हेगार ठरवले. विरोधी पक्ष, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून माझी बदनामी करून मला राजकीय जीवनातून उठविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अनेकांना उसंत नव्हती. त्यामुळे मी बाजूला होऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी राजीनामा दिला आहे, असे स्पष्टीकरण वनमंत्री संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांपुढे दिले. यावेळी राठोड यांच्यासोबत संसदीय कार्यमंत्री ऍड. अनिल परब, शिवसेनेचे नेते-खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

– विरोधी पक्षाची लोकशाहीविरोधी भूमिका

गेल्या 30 वर्षांपासून मी राजकीय जीवनात आहे. आज मला उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणाचा तपास होऊन जर मी दोषी निघालो असतो तर मी राजीनामा दिला असता, पण मला वेळ दिला नाही. त्यामुळे मी बाजूला होऊन या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. या प्रकरणाचा माझ्या व्यक्तिगत आणि राजकीय जीवनावर परिणाम झाला आहे. माझ्या समाजावरही परिणाम झाला आहे. आम्ही अधिवेशनच चालू देणार नाही, ही विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीविरोधी आहे’ असे संजय राठोड म्हणाले.