पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठिंबा – शिवसेना नेते संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देणार, असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारबरोबरच शिवसेना पश्चिम बंगालमध्येही निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे ‘एम’ म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया यांना ममता दीदींविरोधात वापरले जात आहे. त्यामुळे प. बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱया वाघीण आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.