
नागपूरच्या विद्यार्थ्याने गंभीर आजार किंवा मोठय़ा अपघातामुळे महिनोन्महिने अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांकरिता अत्यंत उपयुक्त असा अत्याधुनिक बेड तयार केला आहे. नागपुरातील विश्वेश्वरैया राष्ट्रीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (व्हीएनआयटी) यांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. अतुल अंधारे आणि त्यांच्या पीएच.डी.च्या अनिल ओंकार या विद्यार्थ्याने हा बेड बनवला आहे. ‘बेड विथ कमोड एन्ड साईड टार्ंनग’ असे बेडचे नाव आहे.
असाध्य आजाराने त्रस्त रुग्ण किंवा मोठा अपघात घडल्यानंतर गंभीर जखमी व्यक्ती अनेक महिने अंथरुणावर खिळतात. या रुग्णांच्या शुश्रूषा करण्यासाठी एक व्यक्ती सतत उपस्थित असतो. मात्र गंभीर दुखापत वा असाध्य आजारामुळे अशा रुग्णाच्या विविध क्रिया करून घेणे, शारीरिक स्वास्थ्यासाठी बेडवरच आवश्यक हालचाली करून घेणे आवश्यक ठरतात, मात्र त्या तेवढय़ाच त्रासदायकही असतात. कारण अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांची हालचाल करताना त्याला दुखापतीसह वेदनाही होऊ शकतात. रुग्णांच्या याच वेदना आणि त्यांची सुश्रुषा करणाऱया व्यक्तींची अडचण लक्षात घेऊन खास बेड तयार करण्यात आला आहे. या खास यांत्रिक बेडमुळे रुग्णाला त्याच्या सर्व दैनंदिन क्रिया सहज पार पाडता येणे शक्य होणार आहे.
आईच्या वेदना समजून घेताना…
पीएच.डी. करणारे विद्यार्थी अनिल ओंकार हे स्वतः ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईचा अपघात झाल्याने त्या अनेक महिने अंथरुणाला खिळून होत्या. त्यांची सुश्रुषा करताना अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची शुश्रुषा किती कठीण असते, खासकरून रुग्णाच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे एका व्यक्तीला शक्य नसतात. रुग्णांना ‘बेडसोर’सारख्या समस्या निर्माण होत असतात. तसेच रुग्णांची चादर नियमित बदलणे, त्यांचा कूस बदलण्याची ही आवश्यकता असते.
आईची सुश्रुषा करताना अनिल ओंकार यांच्या लक्षात या सर्व समस्या आल्या आणि त्यांनी भविष्यात रुग्णसेवेसाठी खास बेड तयार करण्याचा निर्धार केला. कधी काळी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अनिल ओंकार यांनी व्हीएनआयटी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांशी भेटून याच विषयावर पीएच.डी. सुरू केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर प्राध्यापक अतुल अंधारे आणि अनिल ओंकार यांनी बेड विथ कमोड एन्ड साईड टार्ंनग संकल्पना साकारली.

































































