
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण हेलिपॅडला परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांचे प्रकरण घडवून आणले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
विधान भवनात यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांडय़ा असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी हा प्रश्न आहे. 2009मध्ये अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता, असेही पटोले म्हणाले.
रामदेवबाबा-अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी?
नागपूरच्या मिहान प्रकल्पात राज्य सरकारने रामदेवबाबांच्या पतंजली समूहाच्या हर्बल अँड फूड पार्कसाठी तसेच अनिल अंबानींच्या उद्योगासाठी नाममात्र दराने जमीन दिली. परंतु त्या जागेवर अद्याप उद्योग उभे राहिलेले नाहीत. शेतकऱयांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने घेतलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार, असा सवाल काँग्रेसचे नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला.
यासंदर्भात नाना पटोले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मिहान प्रकल्पामधील 230 एकर जमिनीवर रामदेवबाबांचा पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्कची निर्मिती करणार होता. रामदेवबाबांना ही जमीन 66 वर्षांसाठी अतिशय कवडीमोल भावात दिली होती. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीसाठीही मिहानमध्ये 289 एकर जमीन देण्यात आली. पण हा प्रकल्पही अद्याप उभा राहिलेला नाही, असे पटोले म्हणाले. रामदेवबाबा, अनिल अंबानींसह ज्यांना उद्योगनिर्मितीसाठी सरकारने जमिनी उपलब्ध करून दिल्या. पण त्या जागेवर उद्योग उभे राहिले नाहीत त्याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिले.





























































