
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना संसर्ग लक्षात घेता केंद्राने यासंदर्भात तीव्र चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत निती आयोगाकडून व्यक्त करण्यात आले आहे. यासंदर्भात इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने देखील चिंता व्यक्त केली असून राज्यात कोविड प्रतिबंधात्मक नियमांकडे सुरू असलेले दुर्लक्ष यास कारणीभूत असल्याचे मत यानिमित्ताने व्यक्त करण्यात आले आहे.
मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखावर पोहचली आहे. त्यामुळे राज्य सरकारबरोबरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, महाराष्ट्रात जो ट्रेंड दिसून आला आहे तो चिंताजनक आहेत. कोविडच्या केससमध्ये होणारी वाढ पाहता येथील नागरिकांचे सुरू असलेले दुर्लक्ष, कमी केलेल्या चाचण्या कारणीभूत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
- महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामीळनाडू येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
- देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 85.91 टक्के रुग्ण हे या राज्यातून सापडत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या अधिक.
- महाराष्ट्राच्या परिस्थितीबाबत चिंता वाटते. हा प्रकार गंभीर आहे. यातून आपल्याला दोन गोष्टी शिकायला हव्यात. कोरोनाचा विषाणू अद्याप गेलेला नाही.
- कोरोनातून मुक्ती हवी असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. – डॉ. व्ही. के. पॉल, सदस्य, निती आयोग




























































