
संभाजीनगर-परभणी महामार्गावरील चारठाणापासून जवळच असलेल्या पिंपरी-गणेशपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. विकास हरिभाऊ राठोड (रा. विरगव्हाण ता.मंठा जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.
विकास विरगव्हाण चारठाणा जवळच असलेल्या ब्राह्मणगाव येथे साडूला भेटण्यासाठी दुचाकीवरून (क्र. एम.एच. 21 ए.एच. 6592) जात होता. यावेळी त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिंतुर येथील शासकीय रुग्णालयात पोलिसांनी दाखल केला. या घटनेचा तपास पोनि. बी.एस. जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अल्लापुरकर व बिट गुलाब भिसे हे करीत आहेत.
जिंतूरात दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
जिंतूरमध्ये दुपारी ग्रामीण रुग्णालयाच्या समोर भागवतआप्पा गाजरे (70) हे रस्त्याने जात असताना भरधाव वेगाने पाठीमागून दुचाकीने त्यांना धडक दिली. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.





























































