ममतांच्या जखमी पायाभोवती फिरला निवडणूक प्रचार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्यात तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचाराचा नूरच पालटला. प्रचंड वेदना होत असतानाही जखमी पायाने व्हीलचेअरवर ममता बॅनर्जी प्रचारात उतरल्या. रविवारी कोलकाता येथील रोड-शो आणि आज पुरूलिया येथील ममता याच्या दोन प्रचारसभांना प्रचंड गर्दी उसळली होती. यामुळे भाजप हादरली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहिल्यांदा प्रचारसभेत ममता यांच्या जखमी पायाचा उल्लेख केला. या निवडणुकीचा प्रचार ममतांच्या जखमी पायाभोवतीच फिरणार हे आता निश्चित झाले आहे. दरम्यान, भाजपने पश्चिम बंगालमध्ये आखलेली निवडणूक रणनीती आता फेल झाली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लवकर बरे व्हा अशी प्रार्थना करतो पण…

बंकुरा ः  ममता बॅनर्जी यांच्या पायाला जखम झाली आहे. त्या लवकर बऱया होवोत अशी मी प्रार्थना करतो; पण पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत भाजपचे 130 कार्यकर्ते राजकीय हिंसाचारात मृत्युमुखी पडले. याविषयी ममता बॅनर्जी यांनी दुःख व्यक्त केले असते तर बरे वाटले असते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

बंकुरा येथे अमित शहा यांची व्हर्च्युअल प्रचारसभा झाली. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना तेथे जाता आले नाही. यावेळी शहा यांनी पहिल्यांदा ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेल्या जखमेचा उल्लेख केला. ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली. कशी झाली हे माहीत नाही. तृणमूल काँग्रेस म्हणते हा कट आहे, तर निवडणूक आयोग म्हणते हा अपघात आहे. व्हीलचेअरवर ममता बॅनर्जी प्रचार करीत आहेत. त्यांच्या पायाची आम्हाला चिंता असून, त्या लवकर बऱया व्हाव्यात अशी मी प्रार्थना करतो. पण आतापर्यंत 130 भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या तृणमूलच्या गुंडांनी केल्या. त्याबद्दल ममतांनी कधी दुःख व्यक्त केले का, असा सवाल अमित शहा यांनी केला. ममता बॅनर्जी सरकारने आदिवासींना सर्टिफिकेट देण्यासाठी पैसे घेतले. आदिवासींचे अधिकार नाकारले. पश्चिम बंगालची जनता दुःखी आहे. ही जनताच मतपेटीतून तृणमूल काँग्रेसला उत्तर देईल,अशी टीकाही अमित शहा यांनी केली.

भाजपाचे कट-कारस्थान मला रोखू शकत नाही

पुरूलिया ः  कितीही तुम्ही (भाजप) कटकारस्थाने केले तरी मला रोखू शकणार नाहीत. जोपर्यंत माझे हृदय सुरू आहे आणि मी बोलू शकते तोपर्यंत मी लढतच राहणार, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. काही दिवस थांबा. माझा पाय बरा होईल. त्यानंतर मी बघते पश्चिम बंगालच्या मातीत तुमचे पाय, कसे मुक्तपणे फिरतात, असा सज्जड दमही ममता यांनी नाव न घेता भाजपला दिला आहे.

पुरूलिया मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या दोन प्रचारसभा झाल्या. व्हीलचेअरवरून ममतांनी जनतेला संबोधित केले. यावेळी मोठी गर्दी उसळली होती. भाजपचे थेट नाव न घेताच त्यांनी इशारा दिला.

‘बाहेरचे’ लोक विधानसभा निवडणुकीत गोंधळ घालण्याचा कट रचत असल्याची माहिती आहे. पुरूलिया प्रशासनाने जिह्याची सीमा सील करावी, असे आदेश त्यांनी दिले. पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि निर्गुंतवणुकीवरून त्यांनी पंतप्रधान हे देश चालवू शकत नाही. तेवढे ते सक्षम नाहीत, अशी टीका केली.

भाजपने खासदारांनाच विधानसभेची उमेदवारी दिली; पण खासदार असताना त्यांनी राज्यासाठी काहीही केले नाही. निवडणुकीनंतर खोटय़ा बातम्या पसरवून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? असा सवालही त्यांनी केला.