
>> प्रशांत गौतम
‘माझे असते पण लोपो! नामरूप हारपो,’ ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची उक्ती प्रत्यक्षात जगलेले कवी म्हणजे अलोन, तथा प्रा. माधवकृष्ण सावरगावकर. नांदेडच्या पीपल्स कॉलेजच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख आणि भाषा शास्त्राचे गाढे अभ्यासक म्हणून जाणकार अभ्यासक, साहित्य रसिकांना माहीत होते. त्यांच्या निधनाने भाषाशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक काळाच्या प्रवाहात निघून गेले आहेत. ज्या दिवशी राज्यभरात कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन, मराठी राजभाषा दिन उत्साहात सुरू होता त्याच दिवशी त्यांनी घेतलेली ‘एक्झिट’ मराठी रसिक, वाचक आणि अभ्यासकांना जास्तच हुरहूर वाटायला लावणारी आहे.
प्रा. सावरगावकर हे भाषाशास्त्राचे गाढे अभ्यासक तर होतेच. एवढेच नव्हे तर संवेदनशील मनाचे ललित लेखक आणि तेवढय़ाच सक्षम प्रतिभेचे कवीही होते. साहित्य लेखनाच्या संपूर्ण प्रवासात त्यांनी ‘अलोन’ याच नावाने कविता लिहिल्या व प्रसिद्धही झाल्या. ‘माधव कृष्ण’ या नावाने ‘आस्वाद’ या साहित्यिक सदरातून मराठी वाङ्मयातील दर्जेदार आणि अभिजात कवी आणि त्यांच्या कवितांवर साक्षेपाने लिहिले. मात्र कविता ‘अलोन’ याच नावाने त्यांनी लिहिल्या. त्या कवितारती मौजसह अन्य वाङ्मयीन नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या. प्रारंभीच्या काळात नांदेडच्या पीपल्स हायस्कूलमध्ये गणित आणि विज्ञानाचे सहशिक्षक राहिलेले सावरगावकर आपला शिक्षकी पेशा चालू असतानाच्या काळात बहिस्त विद्यार्थी म्हणून त्यांनी मराठी विषयात एम.ए.चे यशस्वीरीत्या संपादन केले.
एकाच वेळी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणे आणि त्याच वेळी बहिस्त विद्यार्थी म्हणून मराठी भाषेचे अध्ययन करणे आणि आपली मूळ साहित्य लेखनाची आवडही जोपासणे असे कार्य त्यांनी केले. प्राचार्य नरहर कुरुंदकरांनी ज्या पीपल्स महाविद्यालयाचा नावलौकिक आपल्या व्यासंगी अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर गाजवला, त्या लोकप्रिय महाविद्यालयात सावरगावकर 1973 साली मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून सेवानिवृत्तीच्या काळापर्यंत मराठीचे अध्यापन करीत होते. नरहर कुरुंदकरांचा सहवास ज्या पिढीला लाभला, त्यातीलच सावरगावकर एक महत्त्वाचे लेखक, कवी, प्राध्यापक होते. अवघड संकल्पना सोप्या करून सांगण्याची त्यांना विलक्षण हातोटी होती. त्या कौशल्यातूनच त्यांनी मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांना भाषाशास्त्र-लोकसाहित्य, समीक्षा या वाङ्मयाकडे बघण्याची कलासक्त दृष्टी दिली. त्यातूनच त्यांच्या विद्यार्थ्यांना मराठी वाङ्मय आणि मराठी साहित्याची आवड निर्माण झाली.
सावरगावकर यांच्या निवासस्थानी विविध निमित्ताने महाराष्ट्रातील थोर प्रतिभावंत साहित्यकार येत असत. ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य म. द. हातकणंगलेकर, ज्येष्ठ कथालेखक जी.ए. कुलकर्णी यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. विशेषतः माधवकृष्ण सावरगावकरांचा साहित्य क्षेत्रातील कर्तृत्व प्रवास बघायचा असेल तर त्यांचा व जी. ए. कुलकर्णी यांच्यातील पत्रस्नेह एकदा बघायला हवा. जी.एं.च्या काही पुस्तकात असा पत्रस्नेह व्यक्त झालेला आहे. सावरगावकर मराठवाडा साहित्य परिषद आणि परिषदेचे मुखपत्र असणारे ‘प्रतिष्ठान’शीही अनेक वर्षे निगडित होते. एवढेच नव्हे तर ‘प्रतिष्ठान’चे संपादकपदही त्यांनी काही काळ भूषविले. प्राध्यापक सावरगावकर वेगळे, सदर लेखक माधवकृष्ण वेगळे, ‘अलोन’ टोपणनाव धारण करून कविता लिहिणारे कवी वेगळे आणि साहित्यातील नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे, त्यांच्या नव्या लेखनाचे कौतुक करीत असतानाच त्यांच्यातील दोषही सांगणारे, नवोदितांच्या साहित्य चळवळीस प्रोत्साहन देणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रा. माधवकृष्ण सावरगावकर होत.
ऋजू आणि लोभस असे गुणविशेष लाभलेले सावरगावकर विलक्षण बोलके होत. अत्यंत सहज साधेपणाने जीवन व्यतित करणारे, प्रसिद्धीचा हव्यास न बाळगणारे कशाचाही अजिबात हव्यास नसलेले, अत्यंत सुंदर अक्षर असलेले व्यक्तिमत्त्व होते. सहज साधे जगायचे, कशाचाही आटापिटा करायचा नाही, ही त्यांची भूमिका. त्यांची मित्रमंडळी असलेल्या प्रा. दत्ता भगत, प्रा. श्रीनिवास पांडे, प्रा. मंदा धर्माधिकारी यांच्यासारख्यांना माहीत होते. ‘वास मातीचा की सहवास तिचा काल रात्रीचा’ यासारखे अनेक ‘हायकू’ सावरगावकर यांनी आपल्या साहित्याच्या विविध प्रवासात हाताळले. पण हायकूचा संग्रह काढला नाही. खडतर परिस्थितीचा कधी सार्वजनिक जीवनात फारसा उल्लेखही ते करीत नसत. भरभरून बोलणे आणि मनापासून प्रेम करणे हा त्यांचा सरळमार्गी प्रवास आता विसावला आहे. गोदाकाठी वाढलेले, विस्तारलेले व्यक्तिमत्त्व पुण्यनगरीत चिरंतनाच्या प्रवासात निघून गेले आहे.





























































