
गरीब, आदिवासी, दुर्लक्षित समाजासाठी केंद्र सरकारने बनवलेल्या योजना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात लागू केल्या नाहीत. त्यांच्यामुळेच पश्चिम बंगालचा विकास थांबला, अशी टीका भाजप नेते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली.
पश्चिम बंगालमध्ये एकदा भाजपचे सरकार स्थापन करा, मग टोलेबाजी करण्याची किंवा कट मनी घेण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. भाजप सरकारच्या काळात कुणीही कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याची हत्या करू शकणार नाही, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी दासपूर येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला.
ममता यांनी सांगितले होते की, ‘माँ, माटी और मानुष’! पण आज इथे ना माँ सुरक्षित आहे, ना मानुष सुरक्षित आहे, ना पश्चिम बंगालची माती सुरक्षित आहे, असा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला. राज्यातील जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणे हे मुख्यमंत्री व सरकारची जबाबदारी आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यास राज्यातील कायदा व सुव्यवस्था निश्चितच सुधारेल, असे ते म्हणाले.


























































