राज्यपालपद सोडेन, पण मोदी सरकारविरोधात बोलणारच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारने मला राज्यपालपदावरून हटवले तरी बेहत्तर. मी राजीनामा देईन, पण शेतकऱयांच्या बाजूने बोलणे कदापि सोडणार नाही, असे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज सांगितले. कुत्रं मेलं तरी आमचे नेते दुःख व्यक्त करतात, पण शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 250 शेतकऱयांचा मृत्यू झाला आहे तरी त्यांना दुःख होत नाही. हे नेते गप्प आहेत. हे अत्यंत क्लेशदायक आहे, अशा स्पष्ट शब्दांत मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला.

झुंझनु येथे एका खासगी कार्यक्रमाला राज्यपाल मलिक उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मलिक यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले. कोणत्याही प्रश्नावर तोडगा निघू शकतो. शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये फारसे अंतर नाही. चर्चा केल्यास मार्ग निघेल. किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी मिळाली पाहिजे या मुद्दय़ावरून हे आंदोलन सुरू झाले. ‘एमएसपी’चा कायदा केल्यास प्रश्न सुटू शकेल असे मलिक म्हणाले.

 या आंदोलनात 250 शेतकऱयांचा मृत्यू झाला हे अतिशय वेदनादायी आहे. साधं कुत्रं मेलं तरी आमचे नेते दुःख व्यक्त करतात. पण शेतकऱयांच्या मृत्यूवर काहीही बोलत नाहीत अशा  शब्दांत मलिक यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले. मी संविधानिक पदावर आहे. मी शेतकरी आणि नेत्यांना केवळ सल्ला देऊ शकतो. पण हा प्रश्न तातडीने सोडविला गेला पाहिजे. आता शेतकरी आंदोलनाचा मुद्दा देशभरात पोहचला असल्याने तोडगा निघायला हवा असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वीही केले होते शेतकरी आंदोलनाचे समर्थन

  • मेघालयाचे राज्यपाल होण्यापूर्वी सत्यपाल मलिक हे जम्मु-कश्मीर तसेच गोव्याचेही राज्यपाल राहिले आहे.
  • दोन दिवसांपूर्वीही मलिक यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन करताना मोदी सरकारला सुनावले होते. कृषी कायदे शेतकऱयांच्या हिताचे नाहीत. ज्या देशातील जवान आणि शेतकरी समाधानी नाहीत तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. शेतकऱयांच्या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान्य केल्या पाहिजेत असे मलिक यांनी स्पष्टपणे म्हटले होते.